काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 09:20 AM2020-01-12T09:20:54+5:302020-01-12T09:28:36+5:30
पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये चेकिंगदरम्यान एका गाडीतून हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांसोबत गाडीत जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक (डिएसपी)होते. सुरक्षा दलांनी या पोलीस उपअधीक्षकांना सुद्धा अटक केली आहे. हे पोलीस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहेत.
दोन दहशतवाद्यांमध्ये सय्यद नवीद मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू असून ज्याचा नंबर दहशतवाद्यांचा प्रमुख रियाज नायकूनंतर येतो. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव आसिफ राथर आहे. या दहशतवाद्यांसोबत अटक करण्यात आलेल्या उपअधीक्षकांचे नाव देविंदर सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे. ते एअरपोर्ट सिक्युरिटीसाठी तैनात होते. सुरक्षा दलाने पोलीस उपअधीक्षकांसह तिघांना कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडमधील मीर बाजार परिसरातून अटक केली. नवीद बाबू हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर आहे. तर आसिफ राथर हा गेल्या तीन वर्षापूर्वी या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. हे दोघेही शोपियांमध्ये राहणारे आहेत.
पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्टला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या अँटी हायजॅकिंग स्क्वॉडमध्ये सामील होते. सध्या त्यांची ड्युटी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. याआधी 2001मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह हे दहशतवाद्यांना घाटीतून बाहेर जाण्यासाठी मदत करत होते. पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीने दहशतवादी दिल्लीत येणार होते, असेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, पोलीस उपअधीक्षकांच्या घरी छापेमारी केल्यानंतर 5 ग्रेनेड आणि 3 एके-47 सापडली आहे. पोलीस उपअधीक्षकांना दहशतवाद्यांसोबत अटक करण्याची मोहिम दक्षिण काश्मीरचे पोलीस उपमहासंचालक (डीआयजी) अतुल गोयल यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Encounter underway between security forces and terrorists in Tral,Pulwama.More details awaited. #JammuAndKashmirpic.twitter.com/zQpjT4Xpo5
— ANI (@ANI) January 12, 2020
(PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....)
(१५ देशांच्या राजदूतांकडून काश्मीरमध्ये पाहणी)
(जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट बंदीवरुन सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला खडे बोल)