मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे लोकसभेत सरकारची फजिती
By admin | Published: May 5, 2016 02:47 AM2016-05-05T02:47:38+5:302016-05-05T02:47:38+5:30
रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हे दोघेही अनुपस्थित असल्याने लोकसभेत बुधवारी केंद्र सरकारची
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हे दोघेही अनुपस्थित असल्याने लोकसभेत बुधवारी केंद्र सरकारची चांगलीच फजिती झाली.
भविष्यात अशा घटना घडता कामा नयेत, असा कडक इशारा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना द्यावा लागला. अध्यक्ष महाजन यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रेल्वे मंत्रालच्या ‘गो इंडिया स्मार्ट कार्ड’ या कार्यक्रमाचा मुद्दा चर्चेला घेतला त्यावेळी ही घटना घडली. यावेळी प्रभू किंवा सिन्हा यापैकी कुणीही लोकसभेत हजर नव्हते. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस सदस्यांनी दोन्ही मंत्री अनुपस्थित असल्याबद्दल तीव्र निषेध केला. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न सूचीत असताना दोन्ही मंत्री अनुपस्थित का आहेत, असा सवाल काँग्रेस सदस्यांनी केला.
मंत्री अनुपस्थित राहण्याची ही काही पहिली वेळ नाही. मंत्री नियम पाळत नाहीत. याआधी कॅबिनेट मंत्री अनुपस्थित होते त्यावेळी आम्ही गप्प राहिलो. सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी मंत्र्यांची उपस्थिती आवश्यक आहे, असे खरगे म्हणाले. मंत्रीद्वय अनुपस्थित राहिल्याबद्दल लोकसभाध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ‘हे बरोबर नाही. कॅबिनेट मंत्री कुठेतरी व्यस्त आहेत असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्यमंत्री येथे होते. पण तेही सभागृहाबाहेर निघून गेले आहेत असे वाटते, असे पुन्हा घडता कामा नये. मंत्र्यांनी कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहिलेच पाहिजे,’ असा इशाराही त्यांनी दिला.