दलितांवरील अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते
By admin | Published: October 19, 2016 06:55 AM2016-10-19T06:55:51+5:302016-10-19T06:55:51+5:30
स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते
लुधियाना : स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनीही भारतात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे माझी मान शरमेने खाली जाते, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काढले. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
गुरू गोविंदसिंग यांनी जातियवाद आणि अस्पृश्यता यांच्याविरुद्ध आवाज उठविला होता, याचा उल्लेख करून ते म्हणाले की, समाजातील विसंगतींमुळेच आजही देशात दलित बंधू भगिनींवर अत्याचार होत असल्याचे आजही
आपल्या कानावर पडते, तेव्हा मान
शरमेने खाली गेल्याशिवाय राहत
नाही. स्वातंत्र्याला आता ७0 वर्षे झाली आहेत. त्यामुळे अशा विसंगती, विषमता व अत्याचार थांबलेच पाहिजेत. (वृत्तसंस्था)
>उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज
अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील उद्योजकांना साह्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय हब (उपक्रम)चे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते म्हणाले की, या हबद्वारे दलित आणि आदिवासी तरुणांमधील उद्योजकतेला वाव दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरि मदत केली जाईल. या योजनेतून किमान साडेतीन लाख नवे उद्योजक तयार व्हावेत, अशी सरकारची इच्छा आणि प्रयत्न आहेत. स्टार्टअप योजनेखाली राष्ट्रीयीकृत बँकांनी या उद्योजकांना १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज द्यावे आणि त्यात महिलांचाही समावेश असावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
>आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग
लघु, मध्यम व अतिसुक्ष्म मंत्रालयाची ही योजना आहे. सुरुवातीला योजनेसाठी ४९0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दलित व आदिवासी उद्योजकांना अर्थसाह्य मिळवून देणे, त्यांना उत्पादने तयार करण्यासाठी मदत करणे, तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे काम या हबतर्फे केले जाणार आहे.
दलित आणि आदिवासींनी तयार केलेल्या उत्पादनांपैकी किमान ४ टक्के वस्तू विविध मंत्रालये तसेच राज्य सरकारे यांनी विकत घ्यावीत, असे सांगून मोदी म्हणाले की समाजातील या मागास वर्गाच्या विकासासाठी त्यांची आर्थिक उन्नती हाच प्रमुख मार्ग आहे आणि त्यासाठी सरकार प्रयत्न करेल.