दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी असूनही नागरिकांनी धुमधडाक्यात साजरी केली दिवाळी, प्रदूषणात झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 10:52 AM2017-10-20T10:52:26+5:302017-10-20T10:54:02+5:30
फटाके विक्रीवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदी नंतरही दिवाळीच्या रात्री दिल्ली-एनसीआरच्या हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं.
नवी दिल्ली- फटाके विक्रीवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदी नंतरही दिवाळीच्या रात्री दिल्ली-एनसीआरच्या हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं. पण यामध्ये विशेष म्हणजे फटाके विक्रीवर बंदी असल्याने प्रदूषणाची पातळी गेल्या दिवाळीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी होती. दिल्ली, नोएडा, गुरूग्राम आणि फरिदाबादमधील लोकांनी फटाके विक्रीवर बंदी असूनही इतर ठिकाणांहून फटाके आणून धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली.
Delhi’s RK Puram at 978(Hazardous) on Air Quality Index #AQI
— ANI (@ANI) October 20, 2017
प्रदूषणाची पातळी मोजणारे ऑनलाइन इंडिकेटर्स गुरूवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हवेचा दर्जी खूप खराब झाल्याचे संकेत देत होतं. सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डच्या आकडेवारीनुसार गुरूवारी एअर क्वालिटी इंडेक्स 319 होता. ही परिस्थिती अतिशय खराब आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी हवेतील प्रदूषणाची पातळी अतिशय जास्त होती. त्या दिवशी एअर क्वालिटी इंडेक्स 431 इतका होता. लोकांमध्ये असलेल्या जागृकतेमुळे दिवाळीच्या दिवशी प्रदूषणात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाल्याचं सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डाने म्हंटलं आहे.
सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातल्याने फटाक्यांची दुकान सुरू झाली नाही. लोकांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत कमी फटाके वाजविले. पण दिल्लीत झालेल्या प्रदूषणाची पातळी इतकी होती की नागरिकांना श्वास घ्यायला अतिशय त्रास होत होता. यावर्षी सुप्रीम कोर्टाने दिवाळीच्या आधी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर बंदी घातली होती. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण कमी करणं हा या बंदीमागील हेतू होता. पण या बंदीचा व्यापक परिणाम झाला नाही. फटाके विक्रीवर बंदी असली तरीही लोकांनी इतर मार्गाने फटाके विकत घेतलं आणि गुरूवारी संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली. फटाके विक्रीवर बंदी असली तरी फटाके फोडण्यावर कोर्टाने बंदी घातली नव्हती.
दिल्लीतील आनंद विहारमध्ये प्रदूषण सामान्य प्रदूषणापेक्षा 24 पटीने वाढलं. तर इंडिया गेटच्या परिसरातील प्रदूषण 15 पटीने वाढलेलं पाहायला मिळालं. दिल्लीतील शादीपूर भागात प्रदूषणाची पातळी जास्त पाहायला मिळाली. तिथे एअख क्वालिटी इंडेक्स 420 गेलं होतं.
दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणी छुप्या पद्धतीने फटाक्यांची विक्री झाली. काही दुकांनावर कारवाईसुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे.
Delhi: Visuals of #Smog from NH 24 near Pandav Nagar pic.twitter.com/N1beGXWzJU
— ANI (@ANI) October 20, 2017
दिल्ली पॉल्यूशन कंट्रोल कमिटीच्या आर.के.पुरम मॉनिटरिंग स्टेशनने रात्री 11 वाजता पीएम 2.5 आणि पीएम 10 अनुक्रमे 878 आणि 1179 मायक्रोग्रॅम/क्यूबिक रेकॉर्ड केलं आहे. ही प्रदूषणाबाबतची अतिशय खराब परिस्थिती आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरच्या लोकांना पुढील चोवीस तास किंवा त्याच्यापुढील काही तासही श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
Visuals of #Smog from Ghaziabad pic.twitter.com/jJyNYQuWi2
— ANI UP (@ANINewsUP) October 20, 2017
दरम्यान,एअर क्वालिटी इंडेक्स जर 0-50 असेल तर ती परिस्थिती चांगली समजली जाते. 50-100 असेल तर समाधानकारक परिस्थिती समजलं जातं. पण आकडे यापुढे गेले तर ते सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक असतात.