बंदी उठल्यामुळे लाखोंची उलाढाल होणार
By admin | Published: January 22, 2015 12:07 AM2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:12:09+5:30
- आंबा बागायतदार सुखावले
- आंबा बागायतदार सुखावले
- यंदा १५ ते २0 मेट्रिक टन निर्यातीची अपेक्षा
रत्नागिरी : युरोपीय देशांनी आंबा आयात करण्यावर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी कोकणातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा केली जात आहे. आतापर्यंत २00८-0९ यावर्षी रत्नागिरी जिल्ातून सर्वाधिक ८४ मेट्रिक टन आंबा युरोपीय देशात निर्यात झाला होता. यावर्षी तो किमान १५ ते २0 मेट्रिक टन होण्याची अपेक्षा असून, त्यातून लाखोंची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
भारतातून पाठविल्या गेलेल्या आंब्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी भारतातून आंबा आणण्यावर बंदी आणण्यात आली होती. फळबागांवरील कीड व रोग प्रतिबंधाचे प्रभावी उपाय योजण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळेच येत्या हंगामातील आंबा युरोपीय देशांनी ही बंदी उठविली आहे.
युरोप, अमेरिका व जपान येथे निर्यात सुरू झाल्यापासून आंबा उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडली आहे. युरोपीय देशांच्या हवामानानुसार गॅप प्रमाणपत्र निश्चित करण्यात आले आहे. निर्यातीसाठी त्याची आवश्यकता आहे. अमेरिकेला आंबा पाठवीत असताना गॅमा (विकिरण) प्रक्रिया आवश्यक आहे. सध्या लासलगाव (नाशिक) येथे ही सुविधा उपलब्ध आहे. शेतकर्यांच्या दृष्टीने अधिकच्या अंतरामुळे वाहतूक खर्च परवडत नसल्याने वाशी (नवी मुंबई) येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
अरब राष्ट्र तसेच सिंगापूर, मलेशिया येथे आंबा निर्यातीसाठी त्रास होत नाही; मात्र अमेरिका, जपान व युरोपीय देशांमध्ये आंबा पाठविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड बसला होता. त्यामुळे आंब्याचे दरही कोसळले होते.
भारतातून सन २०११-१२ मध्ये एकूण ६६,४४१ मेट्रिक टन आंबा परदेशात निर्यात करण्यात आला होता. त्यापैकी २५३२ मेट्रिक टन युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. तसेच २०१२-१३ मध्ये एकूण ५५,४१३ मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला. त्यापैकी ३,८९० मेट्रिक आंबा युरोपीय देशात पाठविण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये आयात बंदीमुळे युरोपीय देशात आंबा गेलाच नाही.
रत्नागिरीतून निर्यात झालेला आंबा
२००५-०६ मध्ये ९.५ मेट्रिक टन, २००६-०७ परदेशी पाठविण्यात आलेला नाही, २००७-०८ मध्ये ४०.८२, २००८-०९ मध्ये- ८४.५२, २०१०-११ - ११.०९ , २०११-१२ ला १६.८, २०१२-१३ ला १८ मेट्रिक टन आंबा परदेशी पाठविण्यात आला होता. यंदा सद्य:स्थितीत मोहराचे प्रमाण चांगले असल्याने आणि आयात बंदी उठल्यामुळे यंदा १५ ते २0 मेट्रिक टन इतकी आंबा निर्यात अपेक्षित धरली जात आहे. (प्रतिनिधी)