बॅड न्यूज! लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद; 'हे' आहे त्यामागील खरे कारण
By देवेश फडके | Published: February 2, 2021 06:16 PM2021-02-02T18:16:40+5:302021-02-02T18:19:44+5:30
सामान्य जनतेसह पर्यटकांना आता लाल किल्ला पाहता येणार नाही. कारण जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार अनिश्चित काळासाठी लाल किल्ला बंद करण्यात आला आहे.
नवी दिल्ली :दिल्लीतीललाल किल्ला हे केवळ भारतातील नाही, तर जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे स्थान आहे. दिल्लीत आले की, बहुतांश पर्यटक लाल किल्ल्याला भेट देतातच. मात्र, सामान्य जनतेसह पर्यटकांना आता लाल किल्ला पाहता येणार नाही. कारण जारी करण्यात आलेल्या एका आदेशानुसार अनिश्चित काळासाठी लाल किल्ला बंद करण्यात आला आहे.
दिल्ली सेंट्रलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज (मंगळवारी) एक आदेश काढून याबाबतची माहिती दिली आहे. आदेशात म्हटले आहे की, बर्ड फ्लू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याचा परिसर सामान्य जनता आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे.
कृषी कायद्यावरून दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ; संसदेचे कामकाज तहकूब
बर्ड फ्लूमुळे लाल किल्ला बंद
लाल किल्ला परिसरात काही दिवसांपूर्वी मृत आढळलेल्या कावळ्याचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लाल किल्ला परिसर बंद २६ जानेवारीपर्यंत करण्यात आला होता. यानंतर प्रजासत्तक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली लाल किल्ल्यावर येऊन पोहोचली आणि त्यानंतर त्याला हिंसक वळण मिळाले. या उसळलेल्या हिंसाचारात लाल किल्ल्याचे मोठे नुकसान झाले, असे सांगितले जात आहे.
१५ कावळ्यांचा मृत्यू
दिल्ली सरकारमधील पशुपालन विभागाचे संचालक डॉ. राकेश सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी लाल किल्ला परिसरात १५ कावळे मृतावस्थेत आढळले होते. यानंतर काही नमुने भोपाळ आणि जालंधर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. यात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर १९ जानेवारी रोजी लाल किल्ला सामान्य जनता आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. एकूण स्थितीवर पशुपालन विभागाची देखरेख असून, अधिकाधिक नमुने गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.