भय्यू महाराजांचा मृत्यू ब्लॅकमेलिंग, फसवणुकीमुळे; मुलगी कुहूने मौन सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:45 AM2019-01-03T05:45:59+5:302019-01-03T05:50:01+5:30
ब्लॅकमेलिंग व फसवणुकीमुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप भय्यू महाराज यांच्या कन्या कुहू यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. माझी काळजीवाहक म्हणविणाऱ्या त्या तरुणीने वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
इंदूर : ब्लॅकमेलिंग व फसवणुकीमुळे वडिलांचा मृत्यू झाला, असा आरोप भय्यू महाराज यांच्या कन्या कुहू यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. माझी काळजीवाहक म्हणविणाऱ्या त्या तरुणीने वडिलांच्या बेडरुमवर कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलीस या तरुणीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता आयुषी (महाराजांच्या पत्नी) यांच्यासोबत कुहू जबाब देण्यास तेजाजी नगर पोलीस ठाण्यात पोहोचल्या. मुख्य पोलीस अधीक्षक अगम जैन यांनी त्यांना ३० प्रश्न विचारले. त्या तरुणीसंबंधीही कुहू यांच्याकडे चौकशी केली. आपण कुहू यांच्या काळजीवाहक आहोत, असे त्या तरुणीने सांगितले होते.
ती माझी काळजीवाहक नव्हती, असे स्पष्ट करत कुहू यांनी सांगितले की, मी पुणे येथे राहत होते, तेव्हाही ही तरुणी घरात रहायची. तिने संपूर्ण घरासह वडिलांच्या बेडरुमवरही कब्जा केला होता. याच तणावमुळे वडिलांनी मृत्यू पत्करला. कुहू यांना चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात आले आहे. आता केवळ तोंडी चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आयुषी यांचाही जबाब घेतला जाईल, असे मुख्य पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
३१ डिसेंबर रोजी त्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते की, गुरुजी मला त्यांची कन्या कुहूप्रमाणे मानायचे. गुरुजींनी मला कुहूचे काळजीवाहक केले होते. मी कधीच गुरुजींना एकटी भेटली नाही. तसेच फोनवरूनही बोलले नव्हते. मला कन्या मानून माझ्याकडून वैयक्तिक बाबतीत सल्ला घ्यायचे. त्यामुळे लोकांना असे वाटायचे की, मी त्यांची खास आहे. त्याच कारणामुळे कुहूसुद्धा माझा द्वेष करायची, असे सांगत त्या तरुणीने ब्लॅकमेलिंग आणि लुबाडणूकीचा आरोप फेटाळून लावला.
‘तिच्या’बहिणीच्या लग्नात महाराजांनी केला खर्च
या प्रकरणात महाराजांच्या आई कुमुदनी यांचा जबाब महत्वाचा आहे. त्यांनी औपचारिक चर्चेत अधिकाºयांना सांगितले की, तरुणीने घरात ताबा मिळविला होता. महाराजांना वश केले होते. मोबाइल, सूटच्या बिलावरुन असे दिसून येते की, तरुणीने महाराजांना धमकावून लाखो रुपयांच्या वस्तू घेतल्या होत्या.
तरुणी, विनायक, शरदविरुद्ध पुरावे मिळाले
पोलिसांना तरुणी, विनायक, शरदविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. ते ब्लॅकमेलिंग, धमकीचे पुरावे जमा करत आहेत. यात महत्त्वाचे पुरावे तरुणी व विनायकचा तो फोटो आहे जो विवाहाच्या दिवशी कॅमेºयात कैद झाला. कॉन्ट्रॅक्टर मनमीत अरोराने जे सांगितले त्यावरुन पोलिसांना केस दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अरोराने सरकारी साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे. तरुणीसह महाराजांना गुजरातला नेल्याची त्याने कबुली दिली आहे.
पोलीस आता सर्वांचे जबाब पुन्हा घेत आहेत. संशयाची सुई महाराजांचे निकटचे विनायक दुधाळे, मनमीत अरोरा आणि एक तरुणी यांच्याभोवती फिरत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या महाराजांच्या समर्थकांनी डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांना भेटून या प्रकरणी पुन्हा तपास करण्याची मागणी केली होती.