कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:28 AM2020-04-21T09:28:17+5:302020-04-21T09:49:42+5:30
देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
अयोध्या : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता राम मंदिर निर्माणाच्या तयारीलाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. 30 एप्रिलला राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी देशातील काही निवडक संत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोना व्हायरसमुळे योग्य परिस्थिती नसल्याने कुठल्याही प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करणे योग्य नाही, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.
भूमीपूजनाला ब्रेक -
लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या एका वृत्तानुसार, देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या संपूर्ण योजनेप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रामललाची नव्या भवनात प्रतिष्ठापना करून, वैशाख नवरात्र संपल्यानंतर 30 एप्रिलला भूमीपूजनाबरोबरच राम मंदिराच्या निर्माणालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
उत्तर प्रदेशात सातत्याने समोर येतायेत नवे रुग्ण -
उत्तर प्रदेशातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. सध्या राज्यातील मऊ, एटा आणि सुल्तानपूर येथे नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
प्रसाद म्हणाले, की सोमवारी एकूण 3268 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 1184 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यातील 78 टक्के पुरुष असून इतर सर्व महिला आहेत. तसेच 28 दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 140 जणांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.