हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - शंकराचार्य
By admin | Published: April 13, 2016 09:00 AM2016-04-13T09:00:50+5:302016-04-13T14:21:37+5:30
केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
हरिव्दार, दि. १३ - केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे. केदारनाथला हनीमून साजरा करण्यासाठी येणा-या जोडप्यांमुळे महापूराची आपत्ती ओढवली असे वादग्रस्त विधान व्दारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.
पवित्र हिंदू स्थळांवरील पर्यावरण असेच प्रदूषित होत राहिले तर, आणखी एखादी अशी आपत्ती ओढवेल असा इशारा त्यांनी दिला आहे. देशाच्या विविध भागातून पिकनिक, हनीमूनची मजा करण्यासाठी लोक देवभूमी उत्तराखंडमध्ये येतात. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये महापूर आला होता. अशा अपवित्र गोष्टी इथे थांबल्या नाहीत तर पुन्हा अशीच आपत्ती ओढवेल असे स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.
शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश द्यायलाही त्यांचा विरोध होता. शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला तर, महिलांविरोधात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढतील असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी स्वरुपानंदांच्या विधानाशी असहमती दर्शवत त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते.