विलंबामुळे ‘अर्जुन’च्या खर्चात अनेक पट वाढ
By Admin | Published: August 6, 2015 10:45 PM2015-08-06T22:45:51+5:302015-08-06T22:45:51+5:30
सन १९७४ मध्ये हाती घेतलेला अर्जुन रणगाडा प्रकल्प १९९५ मध्ये पूर्ण झाला. या विलंबामुळे या योजनेवरील खर्च १५.५० कोटी रुपयांवरून ३०५.६० कोटी रुपयांवर
नवी दिल्ली : सन १९७४ मध्ये हाती घेतलेला अर्जुन रणगाडा प्रकल्प १९९५ मध्ये पूर्ण झाला. या विलंबामुळे या योजनेवरील खर्च १५.५० कोटी रुपयांवरून ३०५.६० कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) मुख्य युद्ध रणगाडा (एमबीटी) अर्जुन प्रकल्प मार्च १९९५ मध्ये १२ मूळ नमुने (प्रोटोटाईप) आणि १५ उत्पादनपूर्व शृंखला (पीपीएस) रणगाड्यांच्या लष्करातील समावेशासह यशस्वीपणे पूर्ण केला.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरादाखल गुरुवारी ही माहिती दिली. पर्रीकर यांनी सांगितले की, १९७४ मध्ये अर्जुन रणगाडे प्रकल्पासाठीचा प्राथमिक मंजूर खर्च १५.५० कोटी रुपये होता. १९८०मध्ये त्यात वाढ करून तो ५६.५५ कोटी रुपये करण्यात आला होता. १९८७ मध्ये २८०.८० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला. त्यानुसार डीआरडीओने जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेन्टस् (जीएसक्यूआर-४६७) आणि प्रकल्पासाठी संशोधन कार्य क्षेत्राच्या (स्कोप) आधारावर मंजुरी मिळवली होती. अखेर मार्च १९९५ मध्ये ३०५.६० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चासह ही योजना पूर्ण झाली.
डीआरडीओ अर्जुन रणगाड्यांवर अनेक वर्षांपासून काम करीत आहे का?, अर्जुन रणगाड्यांच्या विकासावरील खर्चात एकूण किती वाढ झाली?, लष्कराने रणगाड्यांची संख्या पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून नव्या पिढीच्या रणगाड्यांचा तपशील मागितला आहे, हे खरे आहे का? असेल तर त्याबाबतचा तपशील काय आणि डीआरडीओ अर्जुन रणगाड्यांचा पुरवठा करण्याच्या स्थितीत आहे वा नाही, याची प्रतीक्षा न करण्याचे कारण काय? अर्जुन रणगाड्यांचे भविष्य काय? असे प्रश्न दर्डा यांनी विचारले होते. यावर पर्रीकर यांनी सांगितले की, लष्कराने ‘फ्यूचर रेडी कम्बॅट व्हिकल’(एफआरसीए)साठी एका डिझाईन प्रतिस्पर्धेसाठी तपशील मागितला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)