प्रवाशांच्या 'या' घाणेरड्या सवयीमुळे विमान उड्डाणांना होतोय उशीर
By admin | Published: March 15, 2017 08:57 AM2017-03-15T08:57:30+5:302017-03-15T09:48:51+5:30
प्रवासी शौचालयात प्लास्टिक बाटल्या, कचरा फेकत असल्याने विमान उड्डाणांना उशीर होत असल्याचं समोर आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - काही दिवसांपुर्वी दिल्लीहून शिकागोला जाणा-या विमानातील आठ शौचालयं खराब असल्याने प्रवाशांना मनस्ताप झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेमुळे शौचालय दुरुपयोगाचा (Toilet Abuse) मुद्दा समोर आला होता. शौचालयात प्रवाशांनी प्लास्टिक बाटल्या आणि कचरा फेकल्याने ते वापरण्यायोग्य राहिलं नव्हतं असं विमान कंपनीने सांगितलं आहे. या सर्वांचा प्रवाशांवर जास्त परिणाम होत नसला तरी याचा भुर्दंड विमान कंपन्यांना पडतो कारण याचा सरळ परिणाम त्यांच्या कमाईवर होत असते. यावर विमान कंपन्यांचं काहीच नियंत्रण नसतं. प्रवासी शौचालय कोणत्याही परिस्थितीत सोडून गेले असले तरी पुढील उड्डाणाची तयारी करायची, की शौचालय दुरुस्त करत बसायचं याचा निर्णय विमान कंपन्यांनाच करायचा असतो.
एका एअरलाईनच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'जेव्हा प्रवासी शौचालयात प्लास्टिक बाटली, डायपर किंवा टिशू पेपर फेकतात तेव्हा त्याचा परिणाम वॅक्यूम फ्लश सिस्टमवर होतो. अनेकदा ही वॅक्यूम फ्लश सिस्टम खराब होते. त्यामुळे ती वस्तू पाईपमधून बाहेर काढावी लागते आणि त्यानंतर फ्लश दुरुस्त केला जातो. यामुळे विमान उड्डाणात उशीर होतो'.
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ केबिन क्रू सदस्याने सांगितलं की, 'जुन्या विमानांमध्ये ब्ल्यू लिक्विड केमिकल टॉयलेट फ्लश सिस्टीम असायची. जेव्हा शौचालय जाम व्हायचं तेव्हा त्यावर गरम पाणी टाकलं जायचं. त्यानंतर काही वेळाने फ्लश केल्यानंतर समस्या सुटायची. पण आता बोईंग 777 आणि 787 सारख्या विमानांमध्ये वॅक्यूम फ्लश आहेत. ही आधुनिक पद्धत आहे. मात्र एका हे जाम झाले की काहीच करु शकत नाही'.
जेव्हा कधी शौचलाय वापरण्याच्या परिस्थितीत नसते तेव्हा केबिन क्रू याची नोंद करते. महिन्यातून किमान 30 ते 60 वेळा तरी ही नोंद होत असून प्रवासी शौचालयात बाटली, कचरा फेकत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
शनिवारी दिल्लीहून शिकागोला जाणा-या एअर इंडियाच्या बोईंग 777 विमानातील प्रवाशांना जमिनीवरुन हजारो फूट उंच उडत असताना शौचालय बंद असल्याने मनस्ताप सहन करावा लागला. 17 तासांच्या प्रवासात विमानातील चार शौचलाय बंद होते, तर उरलेले आठ शौचालय लँडिंगच्या दोन तास आधी बंद करावे लागले. रात्री दोन वाजता उड्डाण केलेल्या विमानातील प्रवाशांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागला.
गेल्या ऑगस्ट महिन्यात नेवार्कहून मुंबईला जाणा-या विमानात शौचालय वापरण्यायोग्य नसल्याने विमानाला इस्तांबूल विमानतळावरच उतरवावं लागलं होतं. मात्र 5 जून ते 23 ऑगस्ट दरम्यान ही परिस्थिती खूपच गंभीर होती. खराब शौचालयांमुळे लंडन, नेवार्क, शिकागो आणि न्यूयॉर्कला जाणा-या 14 विमानांच्या उड्डाणात उशीर झाला.