दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा
By admin | Published: May 11, 2016 06:07 PM2016-05-11T18:07:23+5:302016-05-11T18:07:23+5:30
देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11- गेल्या दोन वर्षांपासून देशातली अनेक राज्यं दुष्काळात भरडून निघाली आहेत. पावसाचं अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई आणि धरणांनी गाठलेला तळ या परिस्थितीमुळे 10 राज्यांवर दुष्काळाचं सावट येऊन ठेपलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारखी राज्यंही या दुष्काळापासून वाचू शकली नाहीत.
टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या सर्व्हेनुसार, देशातली जवळपास 10 राज्यं ही दुष्काळात होरपळत असून, त्याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो आहे. दुष्काळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटींचा बोजा पडला आहे. 256 जिल्ह्यांतले 33 कोटी लोक या दुष्काळामुळे मरणपंथाला लागले आहेत. दुष्काळामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर 6 लाख 50 हजार कोटी ते 1 लाख कोटींचा बोजा पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुष्काळाचा गेल्या 6 महिन्यांपासून अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडतो आहे, अशी माहिती मिळाली आहे. या वर्षी पाऊस वेळेनुरुप पडण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला असल्यानं शेतक-यांना काहीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकार दुष्काळग्रस्तांना पाणी, अन्न आणि आरोग्याच्या सुविधेसाठी प्रतिमाणसी 3 हजारांची मदत करते. जवळपास 33 कोटी दुष्काळग्रस्त हे जोखीम पत्करून जगत आहेत. प्रत्येक महिन्याला दुष्काळग्रस्तांसाठी अर्थव्यवस्थेवर 1 लाख कोटींचा बोजा पडतो, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेतून समोर आली आहे. दुस-या बाजूनं विजेवर दिलेलं अनुदान, स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेली खतं यामुळे अर्थव्यवस्थेला भुर्दंड पडतो आहे. तसेच दुष्काळग्रस्तांचा शहराकडे वाढलेल्या लोढ्यांमुळेही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थव्यवस्थेवर दबाव पडतो आहे. दुष्काळाचा शेतक-यांच्या मुलं आणि पत्नींच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. दुष्काळामुळे अर्थव्यवस्थेवरचा फुगवटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.