अवकाळी पावसाने शेतकर्यांचे वेळापत्रक बदलले
By Admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:54+5:302015-03-24T23:46:37+5:30
शरद नेरकर, नामपूर
शरद नेरकर, नामपूर
नाशिक जिल्ातच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. दर महिन्यात पाऊस, दर महिन्याला गारपीट, वादळ या व अशा नैसर्गिक घटनांमुळे शेतकरी भांबावला आहे. निसर्गचक्र बदलल्याने शेती व्यवसायाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. शेती व्यवसायात आता बदल करावा तरी काय अशा संभ्रमावस्थेत शेतकरी दिसत आहे. शंभरी पूर्ण केलेल्या जुन्याजाणत्या वयस्क शेतकर्यांना असे भयानक वर्ष आठवत नाही. अवकाळी पावसाने शेतकर्यांचे वेळापत्रकच बदललेले दिसत आहे.
डाळींब, द्राक्ष, ऊस, कांदा या पिकांसाठी नाशिक जिल्हा विशेष प्रसिद्ध. भगवा, लाल डाळींब ही जिल्ाच्या डाळिंबांची खासियत. डोळ्यात पाणी आणेल परंतु चवीला गुळचट असलेल्या नाशिकच्या कांद्याची विशेष प्रसिद्धी, तर चवीला गोड व तोंडात टाकल्यावर पाणी होईल यासाठी देश- विदेशात मागणी असणारी नाशिकची द्राक्षे व श्रम करून मेहनतीने ही पिके घेऊन मोठा झालेला आमचा बळीराजा. मात्र सध्याची निसर्गाची अवस्था बघून मनाने, मानाने व अर्थार्जनाने मोठा झालेला शेतकरी सध्या मेटाकुटीस आला आहे. मनाने पुरता खचला आहे.
द्राक्ष, कांदा, डाळींब ही पिके तशी बेभरवशाची. निसर्गाच्या अनुकूलतेवर यांचे अस्तित्व ठरते. द्राक्ष, कांदा ही पिके तर खूपच संवेदनशील. ढगाळ हवामानातील बदलामुळेसुद्धा ही पिके खराब होतात. यंदा दर महिन्यात पाऊस पडत आहे. ढगाळ हवामानात वाढ होत आहे. पूर्वी केव्हातरी होणारी गारपीट ही नित्याची झाली आहे. ही गारपीट पिकांना मारक ठरते आहे. द्राक्षे काढणीला तयार होती. जिल्ातील निफाड, पिंपळगाव, मोसम, आरम या ठिकाणच्या द्राक्षबागांचे भावही ठरलेले होते. सौदेही झालेले होते. मात्र रात्रीतून गारपीट झाली. प्रचंड पाऊस झाला. निंबू, कांद्याच्या आकाराच्या गारा पडल्या. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेथे पक्व झालेले डाळींब या गारपिटीने फुटले, तर फुलावर असलेला फुलांचा गळ झाला. शेतकर्यांना मोठा फटका बसला. कुणी मुला, मुलींचे लग्न ठरवले होते, कुणाला घर बांधावयाचे होते, तर या पिकांवर कुणाला कर्जफेड करावयाची होती. प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने होती. मात्र या सर्व स्वप्नांचा क्षणात भंग झाला. हातात येणारा पैसा गारपिटीने हिरावून नेला.
जोड आहे.