जास्त कार्बोहायड्रेट खाण्यामुळे तरुणपणी मृत्यूचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 05:09 AM2018-09-30T05:09:37+5:302018-09-30T05:10:20+5:30
कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण गरजेचे; खाण्यातील स्निग्धांश कमी ठेवा
कोलकता : जेवणात अधिक स्निग्धांश (फॅट) घेणाऱ्यांपेक्षा उच्च कर्बोदके (हाय कार्बोहायड्रेटस्) घेणाºयांना कमी वयात मृत्यू येण्याचा धोका अधिक आहे, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रूरल एपिडेमियोलॉजी (प्युअर) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, जेवणात स्निग्धांशाचे प्रमाण कमी ठेवल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे मानले जाते. तथापि, हा समज चुकीचा आहे.
साधारणपणे ५४ टक्के कर्बोदके, २८ टक्के स्निग्धांश आणि १८ टक्के प्रोटीन हे सर्वोच्च गुणवत्तापूर्ण जेवण आहे. अशा प्रकारचे जेवण घेणाºयांचा मृत्यूचा धोका कमी गुणवत्ता असलेल्या जेवण घेणाºयांच्या तुलनेत २५ टक्के कमी होतो.
अत्यल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना हृदयाशी संबंधित विकारांनी ग्रासलेले आहे. जगातील एकूण हृदयविकारग्रस्त लोकसंख्येपैकी ८0 टक्के लोकसंख्या या देशात राहते. या संशोधनास डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. तांदूळ, पोळी-भाकरी आणि ब्रेड यांचे जेवणातील प्रमाण कमी करून मधुमेह, लठ्ठपणा आणि अतितणाव (हायपरटेन्शन) या आजारांना दूर ठेवता येते, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. संपृक्त स्निग्धांश (सॅच्युरेटेड फॅटस्) टाळायला हवेत, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
साखरेचे पदार्थ टाळा
कोलकात्यातील अपोलो ग्लेनइगल्स हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ सुव्रो बॅनर्जी यांनी सांगितले की, संतुलित आहारात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त कर्बोदके असता कामा नये. सुमारे ३0 ते ३५ टक्के स्निग्धांश असावेत.
पॉलिश केलेल्या तांदळासारखी शुद्धिकृत (रिफाइंड) कर्बोदके, तसेच साखरेचे पदार्थ टाळायला हवेत.
रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्यास हेच घटक कारणीभूत असतात. त्यातून मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. स्निग्धांश (फॅट) समजले जाते तेवढे वाईट नाही.