काझिरंगा डॉक्युमेंट्रीमुळे व्याघ्र प्रकल्पाची BBCवर ५ वर्षांची बंदी
By admin | Published: February 28, 2017 12:28 PM2017-02-28T12:28:17+5:302017-02-28T12:31:29+5:30
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने बीबीसी वृत्तवाहिनी व त्यांचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.२८ - राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने (NTCA) बीबीसी वृत्तवाहिनी व त्यांचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. ' काझिरंगा नॅशनल' पार्कमधील गेंड्यांच्या संवर्धनासाठी शिका-यांविरोधात अवलंबवण्यात येणा-या कठोर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा माहितीपट (डॉक्युमेंट्री) बीबीसीने तयार केला होता. मात्र यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाने बीबीसीच्या संपूर्ण नेटवर्कवर बंदी घातली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. बीबीसीचा दक्षिण आशियाचा रिपोर्टर जस्टीन रॉलेट याने गेंड्यावर ' वन वर्ल्ड : किलींग फॉर कन्झर्व्हेशन' ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. गेंड्यांच्या संरक्षणांसाठी करण्यात येणा-या कारवाईवर या डॉक्युमेंट्रीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ' अभयारण्यातील गेंड्यांच्या जीवाला कोणापासूनही धोका आहे असे वाटल्यास त्याला गोळी घालण्याचे अधिकार अभयारण्यातील सुरक्षारक्षकांना देण्यात आल्याचा' दावा या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला आहे. तसेच यामुळे गेंड्यापेक्षाही अधिक मनुष्य मारले गेले, असा दावाही त्यात करण्यात आला आहे.
ही डॉक्युमेंट्री प्रसिद्धीपूर्वी परीक्षणासाठी पाठवण्याची सूचना बीबीसीला केली होती. ' मूळ संकल्पनेचे सादरीकरण करताना संतुलन गमावले आहे का, तसेच गाभा सोडून आशय भलतीकडे भरकटला आहे का, हे तपासणे हा त्यामागचा हेतू होता. परंतु बीबीसीने डॉक्युमेंट्री पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्दच केलेली नाही. त्यामुळे गैरलागू असलेला भाग त्यातून वगळणे अद्याप शक्य झालेले नाही, असे सोमवारी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.