सल्ला न फळल्याने वास्तू कंपनीला न्यायालयात खेचले
By admin | Published: March 14, 2016 12:45 PM2016-03-14T12:45:09+5:302016-03-14T14:22:48+5:30
सध्याच्या काळात वास्तूशास्त्राला प्रचंड महत्व आहे. नवीन घर घेताना अनेकजण वास्तूशास्त्र तज्ञांचा सल्ला प्रमाण मानतात.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १४ - सध्याच्या काळात वास्तूशास्त्राला प्रचंड महत्व आहे. नवीन घर घेताना अनेकजण वास्तूशास्त्र तज्ञांचा सल्ला प्रमाण मानतात. घरात पैसा यावा, घरातील सदस्यांची उन्नती व्हावी यासाठी वास्तूशास्त्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार घरात बदल केले जातात.
डीएनएच्या वृत्तानुसार कर्नाटकमध्ये रहणा-या महादेव दुधीलाल यांनीही वास्तूशास्त्र संस्थेच्या सल्ल्यानुसार घरात बदल केले होते. पण त्याचा काहीही फायदा न झाल्याने महादेव यांनी वास्तूशास्त्र संस्थेला ग्राहक न्यायालयात खेचले आहे.
न्यायालयाने त्यांच्या तक्रारीवरुन 'सरला वास्तू'ला नोटीस बजावली आहे. चंद्रशेखर गुरुजी ही संस्था चालवतात. वर्षभरापूर्वी मी टीव्हीवर गुरुजींची वास्तू संदर्भातील जाहीरात पाहिली होती. या जाहीरातील काही जण वास्तूमध्ये दुरुस्ती, बदल केल्यानंतर त्यांची कशी उन्नती झाली ते सांगत होते.
माझ्या आयुष्यातही समस्या असल्यामुळे मी सरला वास्तूची मदत घेण्याचा निर्णय घेतला असे महादेव यांनी याचिकेत म्हटले आहे. सरला वास्तूला सल्ल्याची ११६०० रुपये फि दिली आणि सल्ल्यानुसार घरात बदल केले. घराच्या दुरुस्तीवर आपण साडेचार लाख रुपये खर्च केले. आपल्याला तीन ते आठ महिन्यात चांगले निकाल मिळतील असे सांगितले होते. पण वर्ष उलटल्यानंतरही काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे आपण वास्तू कंपनीला न्यायालयात आव्हान दिल्याचे त्यांनी सांगितले.