भारतासमोर नवं संकट उभं राहणार? देशातील अनेक गावं, शहरं अंधारात जाण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:34 AM2021-10-05T06:34:06+5:302021-10-05T06:37:18+5:30
१६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे.
कोरोनातून थोडी उसंत मिळत असताना जागतिक अर्थव्यवस्थेपुढे अनेक नवनवी संकटे उभी ठाकत आहेत. ब्रिटनमध्ये इंधनाची तर चीन-युरोपात विजेची तीव्र टंचाइ निर्माण झाली आहे. भारतातही कोळशाच्या अभावी वीजनिर्मात्या कंपन्यांचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. एकूणच इंधन, वीज आणि कोळसा यांचे संकट तीव्र होऊ लागले आहे.
संकट येण्याचे कारण काय?
देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे. कोळशाच्या आधारावर वीजनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यामुळे उत्पादनात अडचण निर्माण झाली आहे. १३५ वीजनिर्मिती कंपन्या देशात कोळशावर अवलंबून आहेत. १६ कंपन्यांकडील कोळसा साठा संपुष्टात आला आहे. कंपन्यांकडे आठवडाभर पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे.
कोळशाची टंचाई का?
- कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर औद्योगिक उत्पादन वाढू लागले आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरही कोळशाच्या किमती विक्रमी स्तरावर आहेत.
- देशांतर्गत कोळशाच्या किमती कमी आहेत. किमतीतील या तफावतीमुळे कोळशावर आधारित वीजकंपन्यांचे धाबे दणाणले आहे.
चीनमधील संकट
चीनमध्ये सध्या कोळशाच्या खाणींच्या स्थितीचा आढावा घेतला जात असल्याने तेथे उत्पादन घटले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे चीनमध्येही वीजनिर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे तिथे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये आता स्थानिक थर्मल कोळशाला महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. ४४ टक्के चिनी कंपन्यांना या सगळ्याचा फटका बसला आहे.
युरोपातही वीजसंकट
युरोपात आता थंडीची चाहूल लागू लागली आहे. त्यामुळे तेथे विजेची मागणी वाढली आहे. पुरवठा मात्र घटला आहे. नैसर्गिक वायूनिर्मितीत घट, सौरऊर्जेत घट आणि पवनऊर्जेतील घट यांमुळे युरोपातही वीजसंकट निर्माण झाले आहे. त्यातच ब्रिटनमध्ये इंधनाची टंचाई निर्माण झाल्याने संकट अधिकच गहिरे झाले आहे.