युद्ध न झाल्यामुळे लष्कराचे महत्व कमी झाले - पर्रीकर
By admin | Published: June 15, 2015 04:12 PM2015-06-15T16:12:20+5:302015-06-15T17:47:49+5:30
गेल्या ४०-५० वर्षात युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्व कमी झाले आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. १५ - गेल्या ४०-५० वर्षात युद्ध न झाल्याने लष्कराचे महत्व कमी झाले आहे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. मात्र आपण युद्धाचा पुरस्कार करतो, असा अर्थ त्यातून काढू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. जयपूरमधील एका सेमिनारदरम्यान ते बोलत होते. यावेळी माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड हेही उपस्थित होते.
'सध्या सर्वत्र शांतता असल्याने सामान्य जनतेचा जवानांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे, त्यांच्या नजरेत लष्कराचे महत्व कमी झाले आहे. जवानांना योग्य आदर मिळेनासा झाला आहे, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. गेल्या अनेक वर्षांत युद्ध न होणं हेच त्यामागचे कारण आहे, असे ते म्हणाले. लष्कराच्या दोन पिढ्या कोणतेही युद्ध न लढताच निवृत्त झाल्या, हे जरी खरं असलं तरी त्याचा अर्थ जवानांना योग्य तो आदर मिळू नये असा होत नाही. जवानांच्या समस्यांविषयी आपण अनेक मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहीली असून काहींनी त्यावर कार्यवाही केल्याने सैनिकांचा त्रास कमी झाला आहे, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले.