दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकाने दुर्गामातेवर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 02:03 PM2017-09-24T14:03:09+5:302017-09-24T14:06:53+5:30
दिल्ली विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापकाने ऐन नवरात्रामध्ये दुर्गामातेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापकाने ऐन नवरात्रामध्ये दुर्गामातेबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्याबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. केदार कुमार मंडल असे वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकाचे नाव आहे. ते. दयाल सिंह काँलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी 22 सप्टेंबर रोजी ही पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये वापरण्यात आलेले शब्द अत्यंत आक्षेपार्ह होते. वाद होताच या प्राध्यापकांनी ही पोस्ट आपल्या वॉलवरून हटवली. मात्र सदर पोस्टचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच केदार कुमार मंडलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्राध्यापकांनी ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर दयाल सिंह महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा गट असलेल्या नॅशनल डेमोक्रेटिक टिचर्स फ्रंट (एनडीटीएफ) ने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केदार कुमार मंडल याच्याविरोधात भादंवि कलम 153 अ आणि 295 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच या प्राध्यापकांविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दयाल सिंह कॉलेजमध्ये चालणाऱ्या दोन्ही सत्रांमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहे. तसेच अभाविपने या प्राध्यापकांना तात्काळ घ्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच जेएनयूमध्ये शिकलेल्या या प्राध्यापकांना काही लोकांकडून धमक्याही मिळत आहेत. दरम्यान, दोन्ही महाविद्यालांचे विद्यार्थी आणि अभाविप सोमवारी या प्रकाराविरोधात आंदोलन करणार असल्याचे अभाविप युनिटचे अध्यक्ष वरुण यांनी सांगितले.