पटेल समाजाचा रोष भोवला! गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांचा राजीनामा; ‘ही’ नावे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:09 AM2021-09-12T05:09:26+5:302021-09-12T05:09:55+5:30

गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधीच त्या राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

due to outrage of patel community gujarat chief minister rupani resigns pdc | पटेल समाजाचा रोष भोवला! गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांचा राजीनामा; ‘ही’ नावे आघाडीवर

पटेल समाजाचा रोष भोवला! गुजरातचे मुख्यमंत्री रुपानी यांचा राजीनामा; ‘ही’ नावे आघाडीवर

Next

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या एक वर्ष आधीच त्या राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रुपानी यांच्या नेतृत्वाबद्दल गुजरातमधील पटेल समाजात नाराजी होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपला विजय मिळणे शक्य नाही, हे स्पष्ट दिसत होते. तसेच त्यांना गुजरातमधील कोरोना स्थिती नीट हाताळ‌ता आली नाही. या तीन महत्वाच्या कारणांमुळे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून विजय रुपानी  यांना हटविण्यात आले.

रुपानी आपला राजीनामा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सुपूर्द केला. गेल्या निवडणुकांत गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी फक्त ९९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या. २०१७च्या आधीच्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसने १६ जागा अधिक जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा गुजरातमध्ये भाजपला फटका बसला असे त्यावेळी म्हटले गेले. आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून हटविल्याने पटेल समुदाय नाराज झाला होता. रुपानी यांची ऑगस्ट २०१६मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती.

दिले होते संकेत

मात्र २०२२ साली गुजरातच्या विधानसभा निवडणुका भाजप रुपानी यांच्या नेतृत्वाखाली लढणार नाही, हे काही प्रसंगांतून लक्षात आले होते. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सी, आर. पाटील यांची जुलै २०२० मध्ये निवड हा पहिला संकेत होता. पाटील हे मोदी यांचे निकटवर्तीय आहेत. मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कामांची नीट व्यवस्था लावण्याचे काम पाटील पाहात असत. गुजरातमधील कोरोना स्थिती विजय रुपानी यांनी नीट न हाताळल्याने भाजप नेतृत्व व जनता असे दोघेही त्यांच्यावर नाराज होते. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा व उत्तराखंडमध्ये तीरथसिंह रावत यांनाही काही महिन्यांपूर्वी भाजपने मुख्यमंत्रीपदावरून हटविले होते.

पुढील मुख्यमंत्री कोण? ही नावे आघाडीवर

- भावी मुख्यमंत्री म्हणून विद्यमान केंद्रीय अरोग्यमंत्री मनसुख मांडवीय व उपमुख्यमंत्री नितीन पटेल, विद्यमान मंत्री आर. सी. फालदू, दादरा-नगरहवेली, लक्षव्दीपचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांची नावे शर्यतीत आहेत. 

- मांडवीय यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्यात केंद्रीय आरोग्यमंत्री केले. राज्यसभेचे दोनदा सदस्य राहिलेल्या मांडवीय यांना २०१२च्या विधानसभा निवडणुकांत भाजपने उमेदवारी नाकारली होती. २००७ साली ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकले होते. 

- मांडवीय हे पटेल समाजातील आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर परीक्षा घेऊनच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. 

- मनसुख मांडवीय हे वादग्रस्त नसलेले, साधे राहणीमान असलेले नेते आहेत. त्यांचे नाव कोणत्याही उद्योगसमुहाशी जोडले गेलेले नाही.
 

Web Title: due to outrage of patel community gujarat chief minister rupani resigns pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.