महिला पत्रकारांच्या दबावामुळे अकबर मंत्रिपदावरुन पायउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:27 AM2018-10-18T05:27:06+5:302018-10-18T05:27:33+5:30
आयबीचा होता अहवाल; भाजपाही कारवाई करण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : महिला पत्रकारांकडून येणारा दबाव आणि रा. स्व. संघाकडून व्यक्त झालेली तीव्र नाराजी यांमुळे अखेर एम. जे. अकबर यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता भाजपाही त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अकबर यांनी राजीनाम्याची माहिती देताना म्हटले की, माझ्याविरुद्धच्या आरोपांबाबतची न्यायालयीन लढाई मी वैयक्तिक पातळीवर लढू इच्छितो. त्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.
देशभरातील २00 हून अधिक महिला येत्या दोन दिवसांत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्च्याने जाऊन, मोदी यांच्याकडे संरक्षण मागण्याच्या तयारीत असल्याचा अहवाल इंटलिजन्स ब्युरोने दिला होता. त्यामुळे अकबर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. प्रेस क्लब आॅफ इंडिया आणि विमेन्स प्रेस कॉर्प्स या संघटनेने मंगळवारीच अकबर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रा. स्व. संघानेही महिला पत्रकारांच्या अकबर हटाव मोहिमेला पाठिंबा दर्शवला होता.
सुमारे २0 महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करीत असताना, त्यांना मंत्रीपदी ठेवलेच कसे जाते, अशी भूमिका संघाने घेतली होती. संघाचे कार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठिंबा दिल्यानंतर. अकबर यांचे मंत्रीपद जाणार, हे स्पष्ट झालेच होते. होसबळे व मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
..त्यानंतर दिला राजीनामा
पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना मंगळवारी अकबर यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे ते लगेचच राजीनामा देतील, अशी अटकळ होती. पण त्यांनी लगेच राजीनामा दिला नव्हता. अकबर यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष देण्यास देशातील २0 महिला पत्रकारांनी तयारी दर्शवली आहे.