विद्यार्थिनींकडून ‘खासगी’ माहिती घेण्यावरून वादंग!

By admin | Published: September 1, 2016 06:31 AM2016-09-01T06:31:57+5:302016-09-01T06:31:57+5:30

राजस्थानमधील एका महिला विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींकडून मासिक पाळी आणि गर्भारपण यासारख्या अत्यंत खासगी बाबींची माहिती भरून घेण्यात येत

Due to the 'private' information from the girl students! | विद्यार्थिनींकडून ‘खासगी’ माहिती घेण्यावरून वादंग!

विद्यार्थिनींकडून ‘खासगी’ माहिती घेण्यावरून वादंग!

Next

जयपूर : राजस्थानमधील एका महिला विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींकडून मासिक पाळी आणि गर्भारपण यासारख्या अत्यंत खासगी बाबींची माहिती भरून घेण्यात येत असल्याचे उघड झाल्याने वादंग उठले आहे. हा प्रकार किळसवाणा व खासगी आयुष्यात नाक खुपसणारा असल्याचे सांगून महिला हक्क कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठविली आहे. मात्र विद्यार्थिनींना अधिक चांगल्या आरोग्यसेवा पुरविण्यासाठी त्यांचे अशा प्रकारचे ‘हेल्थ प्रोफाइल’ करणे गरजेचे असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
जयपूरपासून ८५ किमी अंतरावर असलेल्या टोंक जिल्ह्याच्या शहरातील बाणस्थळी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींकडून एका छापील फॉर्मवर अशा प्रकारची माहिती भरून घेतली जाते. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या राजस्थानात स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले असून, तेथे निवासी शिक्षणाची सोय आहे. विद्यार्थिनींना प्रवेशाच्या वेळी भरण्यासाठी दिल्या जाणाऱ्या १० पानी हिंदी फॉर्ममध्येच अशा प्रकारची माहिती घेण्यासाठी प्रश्नांचे रकाने आहेत. तुमची मासिक पाळी नियमित येते का?, शेवटची मासिक पाळी केव्हा आली होती? आणि काही स्त्रीविषयक समस्येसाठी आपण कधी डॉक्टरकडे गेला होतात का? हे तीन प्रश्न सर्व विद्यार्थिनींसाठी सामायिक आहेत. विवाहित विद्यार्थिनींसाठी आपण सध्या गरोदर आहात का?, आपली शेवटची प्रसूती कधी झाली होती? आपला कधी गर्भपात, अर्धवट काळाची प्रसूती किंवा सिझेरियन शस्त्रक्रिया झाली होती का? असे स्वतंत्र प्रश्न विचारण्यात येतात.
विद्यापीठाच्या एका वसतिगृहात
एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्यानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींकडून अशा प्रकारची माहिती भरून घेणे सुरू केले गेले, असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. विद्यापीठात सध्या शिकत असलेल्या कोणी या विषयावर बोलायला तयार नाहीत.
ज्या माजी विद्यार्थिनी बोलायला तयार झाल्या, त्यांनी असा फॉर्म भरून घेतला गेला यास दुजोरा दिला. पण अशी माहिती घेणे योग्य की अयोग्य यावर त्यांच्यात मतभिन्नता दिसली. काहींना हे आक्षेपार्ह वाटले, तर काहींनी यात काही गैर नाही, असे मत व्यक्त केले. (वृत्तसंस्था)


विद्यार्थिनींना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्याकडून हा ‘हेल्थ प्रोफाइल’चा फॉर्म भरून घेतला जातो. या माहितीवरून चांगल्या आरोग्यसेवा पुरविणे सोयीचे जाते. प्रसूती व गरोदरपणाविषयीची माहिती फक्त विवाहितांकडून घेतली जाते. अविवाहितांकडून त्यांच्या लैंगिक आरोग्याविषयी माहिती घेतली जात नाही.
-आदित्य शास्त्री, कुलगुरु, बाणस्थळी विद्यापीठ

Web Title: Due to the 'private' information from the girl students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.