विधान भवनाला भुतांनी झपाटले?, पुजा-याकडून विधिवत शुद्धीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:54 AM2018-02-24T02:54:20+5:302018-02-24T02:54:20+5:30
राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे.
जयपूर : राज्यातील जनतेचे कल्याण करणे हे तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असते. पण लोकप्रतिनिधींनीच भुतांची धास्ती घेतली आहे. भुतांपासून रक्षणासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळेच गुरुवारी विधानमंडळाच्या प्रवेशद्वारावर भुताचा प्रभाव घालवण्यासाठी पुजारी विधी करताना पाहायला मिळाले! हा प्रकार राजस्थानात घडला आहे.
राजस्थान विधानसभा एकूण २०० सदस्यांची आहे. परंतु गेली अनेक वर्षे एकाच वेळी २०० आमदारांची संख्या पूर्ण झालेली नाही. राजीनामा, आकस्मिक निधन किंवा खटल्यात शिक्षा झाल्याने तुरुंगात रवानगी यामुळे सभागृहात एका वेळी २00 आमदार कधीच नसतात. विधान भवनावर भुतांचा प्रभाव असल्यानेच हे होत आहे, अशी बहुतांश आमदारांची धारणा आहे. आमदार हबिबूर रहमान म्हणाले की, विधान भवनाआधी ही जागा अंत्यसंस्कारासाठी तसेच कबर बांधण्यासाठी वापरली जात असे. अशा ठिकाणी भुते भटकत
असतात.
मंगळवारी भाजपा आमदार कल्याणसिंह चौहान यांचा मृत्यू झाल्याने सारेच आमदार घाबरले आहेत. सैतानी शक्तीविरोधात उपाययोजना करण्याची मागणी ते करू लागले. मागील आ. कीर्ती कुमारी यांचे निधन झाले. त्याआधी बसपाचे आ. बी. एल. कुशवाह यांना तुरुंगात जावे लागले. काँग्रेस आ. महिपाल मदरेना, मलखन सिंग बिष्णोई व बाबूलाल नागर यांनाही तुरुंगात जावे लागले. त्यामुळे इथे भूत, सैतानी शक्तीचा वावर आहे, असे अंधश्रद्धाळू आमदारांना ठामपणे वाटते.