अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुतांश वीज पुरवठा सुरळीत राखण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:40 PM2018-06-02T18:40:52+5:302018-06-02T18:40:52+5:30
मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला.
मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या मोठ्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र अथक मेहनत घेऊन विजेचा ताळमेळ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे भांडुप नागरी परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला. कळवा येथील उपकेंद्राच्या आगीमुळे अद्यापही परिस्थिती पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार आहे. यादरम्यान ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात तुरळक प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो. अशा काळात महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे उपकेंद्रातील यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला होता. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महापारेषणच्या २२० केव्ही खारघर बोरीवली वाहिनी ही २२० केव्ही महापे वाहिनीस जोडण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा आटोकाट प्रयत्नामुळे काही तुरळक भाग वगळता ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. मात्र, तरीही विजेची मागणी वाढल्यास यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा परीस्थितीत महावितरणने ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात कमीत कमी व्यत्यय येईल याकरता प्रभावी नियोजन केले आहे. या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.