लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 12:32 PM2019-05-26T12:32:37+5:302019-05-26T12:34:30+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला.
रांची/पाटणा - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. अनेक राज्यात स्थानिक पक्षांचा दारुण पराभव झाला. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांची दाणादाण उडाली. एकेकाळी बिहारच्या राजकारणावर एकछत्री वर्चस्व गाजवणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. दरम्यान, लोकसभेच्या निकालात आरजेडीच्या झालेल्या दारुण पराभवामुळे पक्षप्रमुख लालूप्रसाद यादव यांना धक्का बसला आहे. निकालांनंतर लालूप्रसाद यादव यांनी जेवण कमी केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत आहे.
चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या रांची येथील आरआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून लालू यादव हे सकाळी कसाबसा नाश्ता करतात. मात्र दुपारचे भोजन न करता थेट रात्री जेवण घेतात. त्यामुळे जेवण कमी केल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
''आम्ही आपल्यपरीने त्यांची खूप समजूत घातल आहोत. अशाप्रकारे जेवण सोडणे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगले नाही. जर त्यांनी वेळेत भोजन केले नाही तर त्यांना ओषध आणि इंशुलिन देण्यात अडचणी येतील. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टर म्हणाले. तसेच निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यामुळे लालूंची अशी स्थिती झाली आहे का, असे विचारले असता डॉक्टरांनी आम्ही याबाबत त्यांना काहीही विचारलेले नाही. मात्र तुम्ही निष्कर्ष काढू शकता, असेही सांगितले.
मात्र राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी ही बाब फेटाळून लावली आहे. लालूजींसाठी ही काही पहिली निवडणूक नाही, असे सांगत पराभावमुळे लालूप्रसाद यादव तणावात असल्याचे वृत्त फेटाळले. तर लालूप्रसाद यादव यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात कडवे आव्हान उभे करण्याचे आदेश दिले आहेत, असे अन्य एका आमदाराने सांगितले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपाने एकतर्फी विजय मिळवताना 40 पैकी 39 जागांवर कब्जा केला. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीला एकही जागा मिळाली नाही. तर काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीसाठी आरजेडीने काँग्रेस, आरएलएसपी, हम आणि व्हीआयपी या पक्षांसोबत महाआघाडी केली होती.