घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 10:15 AM2018-09-18T10:15:47+5:302018-09-18T10:17:07+5:30
येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणारे रुपयाचे मुल्य, इंधन दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब येत्या दिवाळीत उसळणार असून फराळ आणि इतर वस्तू महागणार आहेत. येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत.
घाऊक बाजारात सणांसाठी लागणाऱ्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल लायटिंग, सुका मेवा, गिफ्ट अशा वस्तूंचा समावेश आहे. डीलर या वस्तू जादा दर लावून किरकोळ बाजारात विकत आहेत. यामुळे ग्राहकांना 20 ते 30 टक्के जादा दराने या वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. यासाठी घसरत चाललेला रुपयाही कारणीभूत आहे. दिवाळीपर्यंत रुपया वधारण्याची चिन्हे दिसत नसल्याने आयातदारही घाबरलेले आहेत. यामुळे वाढलेल्या दरांवरच माल विकत आहेत.
अमेरिकेचे चीनसोबतचे व्यापारयुद्ध आणि एलइडी लाईटचे दर घसरूनही केवळ रुपया घसरत असल्याने चीनमधून 15 ते 20 टक्के जादा दराने मालाचा पुरवठा होत आहे. जुलैपासून आतापर्यंत जवळपास 70 टक्के आयात व्यवहार झाले आहेत. यापैकी अर्ध्या व्यवहारांचे पैसेही देण्यात आले आहेत. चीनचे चलनही डॉलरच्या तुलनेत घसरले असले तरीही भारतीय रुपयाची घसरण जादा असल्याने वस्तू महाग दराने घ्याव्या लागणार आहेत, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
अरब राष्ट्रांमधून सुकामेवा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचीही घसरणाऱ्या रुपयामुळे गोची झाली आहे. इंडो-अफगान चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव विकास बंसल यांनी सांगितले की, या वर्षी रुपया 12 टक्क्यांहून जास्त घसरला आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या सुक्यामेव्यावरही कर वाढविला आहे. अधिकाधिक बदाम हे अमेरिकेतून आयात होतात. तर काजू, पिस्ता आणि इतर पदार्थही आयातीवरच अवलंबून आहेत. यामुळे किंमती वाढल्या आहे. भविष्यात जेवढा रुपया घसरेल तेवढीच महागाई वाढणार आहे.
सुकामेवा कितीने वाढला?
650 ते 800 रुपयांच्या दराने विकला जाणार बदाम 700 ते 1100 रुपये किलोने विकला जात आहे. अमेरिकी आणि इराणी पिस्ता 15 ते 20 टक्क्यांनी वाढून 1100 रुपये किलोवर पोहोचला आहे. चॉकलेट, क्रॉकरी आणि भेटवस्तू सारख्या वस्तूंही रुपयाच्या किंतीवर अवलंबून असल्याने व्यापारी सध्याच्या कमी दराने व्यवहार करत आहेत. या वस्तूंच्या किंमतीही 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत.