कोळशाच्या टंचाईमुळे वीज प्रकल्प पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 06:25 AM2018-10-19T06:25:03+5:302018-10-19T06:25:05+5:30
नवी दिल्ली : विजेची मागणी वाढलेली असतानाच कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे देशातील १०,५०० मेगा वॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प बंद ...
नवी दिल्ली : विजेची मागणी वाढलेली असतानाच कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे देशातील १०,५०० मेगा वॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. यातील २,७०० मेगा वॅट क्षमतेचे प्रकल्प सप्टेंबरमध्ये, तर ४,२१० मेगा वॅट क्षमतेचे प्रकल्प आॅक्टोबरमध्ये बंद पडले आहेत.
यापैकी बहुतांश प्रकल्प महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगढ या राज्यांतील आहेत. यातील बहुतांश प्रकल्प कोळसा खाणींपासून दूरवर आहेत. कोळसा वाहतुकीच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत कोळसा वेळेत पोहोचविणे अशक्य झाल्याने त्यांचे वीज उत्पादन थांबले आहे, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत विजेची मागणी वाढली आहे. प्रकल्पांसाठी मात्र ही बाब संकट निर्माण करणारी ठरली आहे. चालू वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील पहिल्या १५ दिवसांत विजेची मागणी १२.६ टक्क्यांनी वाढली. १६ आॅक्टोबर रोजी ३३ वीज निर्मिती प्रकल्पांकडे केवळ सात दिवस पुरेल इतकाच कोळसा होता.