अरेरे! विधींना उशीर होताच नवरा-नवरी भिडले; एकमेकांना मारत थेट लग्नच मोडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:50 AM2024-03-05T11:50:28+5:302024-03-05T12:14:44+5:30
लग्नाच्या विधींना उशीर झाल्यामुळे हार घालताना वधू-वरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि दोघांनी एकमेकांना कानशिलात लगावली.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये लग्नाच्या विधींना उशीर झाल्यामुळे हार घालताना वधू-वरांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि दोघांनी एकमेकांना कानशिलात लगावली. हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की नवरा-नवरीने लग्नाला थेट नकार दिला आणि लग्नाची वरात नवरीशिवायच परतली.
मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन भागात ही घटना घडली आहे जिथे सोमवारी एका जोडप्याचा प्रेमविवाह होणार होता आणि लग्नादरम्यान वधू-वरांमध्ये बाचाबाची झाली. मेरठच्या दौराला पोलीस स्टेशन परिसरात राहणारी तरुणी दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करते आणि तरुणही तिच्यासोबत काम करतो.
काम करत असतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांच्याही घरच्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. सोमवारी हा तरुण मोठ्या उत्साहात लग्नाची वरात घेऊन मेरठच्या दौराला भागात पोहोचला होता.
लग्नाच्या विधींना थोडा उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्यात आले असले तरी हार घालण्याच्या वेळी विधी होण्यास उशीर झाल्याने वधू-वरांचा राग अनावर झाला.
संतापलेल्या वधूने वराला कानशिलात लगावली, त्यानंतर वरानेही वधूला कानशिलात लगावली आणि प्रकरण चिघळलं. यानंतर पुढे दोघांनीही लग्नाला नकार दिला आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. पोलिसांसमोर दोन्ही पक्षांनी लग्नाला नकार दिला.
लग्नासाठी खर्च केलेले पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन तडजोड झाली. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला, त्यानंतर वधू-वरांनी लग्नास नकार दिला. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल.