ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 07:56 AM2024-06-08T07:56:30+5:302024-06-08T08:37:30+5:30

विरोधकांनी लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचे काम केल्याचा पंतप्रधानांचा आरोप

Due to EVM, the opposition's speech is stopped, 'NDA' is a strong coalition government - Narendra Modi | ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विरोधक लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडविण्याचा आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या निवडणुकीतील विजयावर पराभवाची छाया पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. सत्ताधारी गटाने या निवडणुकीत मोठा विजय मिळवला, असे सांगत त्यांनी आघाडी आणि आकडेवारीच्या संदर्भात पाहिल्यास ‘एनडीए’चे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे, अशी ग्वाही दिली. 

संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केल्याबद्दल विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना फटकारले आणि आरोप केले की जर निकाल त्यांना अनुकूल नसेल तर ते देशभरात आगडोंब उसळण्याची भाषा करत होते. तथापि, ईव्हीएमने ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांची बोलती बंद केली. हे निकाल म्हणजे त्यांच्या सरकारच्या अजेंड्याला देशव्यापी पाठिंबा मिळाल्याचा दावा मोदी यांनी केला. 

सर्व निर्णयांमध्ये एकमत साध्य करणे हेच लक्ष्य 
पुढच्या सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये एकमत व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि एनडीए ही ‘प्रथम राष्ट्र’ या तत्त्वाशी बांधील असलेली एकजीव आघाडी आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. परस्पर विश्वास हा या युतीचा गाभा आहे आणि आपण ‘सर्व पंथ समभाव’ या तत्त्वाशी बांधील आहेत,  असेही त्यांनी सांगितले.

मोदी म्हणाले....
इंडिया आघाडी वेगाने रसातळाला जाणार हे स्पष्ट दिसत आहे. विरोधकांचा सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करून निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षांची मानसिकता गेल्या शतकातील. त्यांचा प्रगती, आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा विरोध. मी जगभरात भारत ही ‘लोकशाहीची जननी’ असल्याचा ढोल वाजवत असताना विरोधक मात्र भारतात लोकशाही नसल्याचे जगाला सांगतात. आमची १० वर्षे फक्त ट्रेलर होती. आम्ही देशाच्या विकासासाठी अधिक कठोर आणि वेगाने काम करू.

नऊ नेत्यांनी दिले अनुमोदन
संसदेच्या संकुलाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत भाजपच्या तीन नेत्यांसह मित्रपक्षांच्या नऊ नेत्यांनी मोदींच्या निवडीला अनुमोदन दिले. आपल्या सरकारची धोरणे आणि कार्यक्रम ठळकपणे मांडताना मोदींनी वारंवार ‘एनडीए’चा उल्लेख केला.
याशिवाय एनडीएचे सहकारी तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) एन. चंद्राबाबू नायडू आणि जेडी(यू)चे नितीश कुमार यांच्यासह विविध सदस्यांनी आपापल्या राज्यात विकास कसा घडवून आणला याचा उल्लेखही केला. 

काँग्रेसला दशकानंतरही १०० चा आकडा गाठता आला नाही
“काँग्रेसला २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत आम्हाला मिळाल्या आहेत. दशकानंतरही त्यांना १०० चा आकडा गाठता आलेला नाही, याकडे मोदींनी लक्ष वेधले.

Web Title: Due to EVM, the opposition's speech is stopped, 'NDA' is a strong coalition government - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.