परीक्षा चुकण्याची भीती, ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींनी 2 किमी धावत गाठलं परीक्षा केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 02:32 PM2023-02-19T14:32:57+5:302023-02-19T14:47:16+5:30
वेळेत पोहचू शकलो नाही तर परीक्षेसाठी आतमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळेच विद्यार्थिनींची धावपळ सुरू झाली.
बिहारमधील ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनींनी परीक्षेला वेळेत पोहोचता यावं म्हणून दोन किलोमीटर धावत परीक्षा केंद्र गाठल्याची घटना समोर आली आहे. वेळेत पोहचू शकलो नाही तर परीक्षेसाठी आतमध्ये घेतलं जात नाही. त्यामुळेच विद्यार्थिनींची धावपळ सुरू झाली. मुलींचा धावतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण विद्यार्थिनींचे कौतुक करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या मोहनिया येथील 11 परीक्षा केंद्रांवर मॅट्रिकची परीक्षा सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याची वेळ निश्चित आहे. विद्यार्थी उशीरा आल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश बंद केला जातो. याच दरम्यान, शुक्रवारी सकाळी नातेवाईकांसह वाहनातून येणाऱ्या विद्यार्थिनी ट्रॅफिकमध्ये अडकल्या. काही वेळ थांबूनही वाहने पुढे न गेल्याने विद्यार्थिनींनी रस्त्यावरच धावायला सुरुवात केली.
जवळपास दोन किलोमीटर धावून विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. परीक्षा चुकण्याच्या भीतीने विद्यार्थिनींनी धाव घेतल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक पोलिसांसोबतच NHAI टीमही ट्रॅफिकवर मार्ग काढत आहे. माहिती मिळताच मोहनिया पोलीस स्टेशनचे अध्यक्ष ललन कुमार टीमसोबत NH-2 पाटणा वळणावर दाखल झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"