दिल्लीत मुसळधार पावसानं विमानतळ टर्मिनल-१ वर लोखंडी छत अंगावर पडले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:33 AM2024-06-29T07:33:01+5:302024-06-29T07:33:55+5:30
पहाटे विमानतळावर वाहतूक अन् गर्दी कमी असल्याने मोठी मनुष्यहानी टळली, मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला.
नवी दिल्ली : विमानतळाच्या टर्मिनल-१ वर शुक्रवारी छताचा काही भाग कोसळला तेव्हा काहीही तुटल्यासारखा मोठा आवाज आला नाही. मात्र, लोखंडी बीम (छताचा काही भागासह) गाड्यांवर पडल्याने लोकांना घटनेची माहिती मिळाल्याने तेथे गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी आरडाओरड करताना दिसले. अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने ही माहिती दिली.
राष्ट्रीय राजधानीत मुसळधार पावसात शुक्रवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-१’ च्या छताचा काही भाग वाहनांवर पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. टर्मिनलच्या ‘पिक-अप’ आणि ‘ड्रॉप’ भागात छताचा काही भाग आणि सपोर्टिंग बीम कोसळल्याने अनेक कारचे नुकसान झाले.
दुसऱ्या कॅब चालकाने सांगितले की, अपघाताच्या वेळी तेथे खूप कमी लोक उपस्थित होते आणि वाहतूक देखील कमी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्युटीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना आणि विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली.
अनेक रस्ते जलमय, वाहतुकीचा बोजवारा
गेल्या ८८ वर्षांनंतर जून महिन्यात एका दिवसातला सर्वाधिक पाऊस शुक्रवारी सकाळी कोसळला. त्यामुळे दिल्लीतील अनेक रस्ते जलमय झाले, वाहतुकीचा बोजवारा उडाला. मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २० ते ३० तासांत दिल्लीत सफदरजंग येथे २२८.१ मिमी पावसाची नोंद झाली. लोधी रोड येथे १९२.८ मिमी, पालम येथे १०६.६ मिमी, आयानगर येथे ६६.३ मिमी पाऊस पडला आहे. जूनमधील सरासरी ७४.१ मिमी पावसापेक्षा हे तिप्पट प्रमाण आहे.
खासदारांच्या बंगल्यांतही पाणी
दिल्लीच्या पाणीपुरवठा खात्याचे मंत्री रामगोपाल यादव, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले असल्याचे सांगण्यात आले.
सरकारचा दावा फोल : काँग्रेस
गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामात भ्रष्टाचार झाला असल्याची टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर केली. जबलपूर विमानतळाचे कोसळलेले छत, अयोध्येतील नव्या रस्त्यांची दुरवस्था, राममंदिरामधील पाणीगळती, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकरोडला गेलेले तडे, मोरबी पूल कोसळण्याची घटना ही निकृष्ट बांधकामांची काही उदाहरणे आहेत. आम्ही जागतिक दर्जाची बांधकामे केली हा सरकारचा दावा त्यामुळे फोल ठरला आहे, असे खरगे म्हणाले.