"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:22 IST2024-06-01T14:20:51+5:302024-06-01T14:22:33+5:30
Lok Sabha Election 2024: गोरखपूरचे खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी बदललेल्या वातावरणाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या साधनेमुळे वातावरण आल्हाददायक बनले, असा दावा रवी किशन यांनी केला आहे.

"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा
आज उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीसाठीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाळ्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत आहे. मात्र आज बदललेल्या महिन्याबरोबरच आलेल्या पावसामुळे राज्यातील वातावरणही बदललं आहे. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी बदललेल्या वातावरणाचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या साधनेमुळे वातावरण आल्हाददायक बनले, असा दावा रवी किशन यांनी केला आहे.
रवी किशन याबाबत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधनेमध्ये लीन झाले आणि हवामानात बदल होऊ लागला. मोदी साधनेत लीन होताच वातावरण आल्हाददायक बनले. जेव्हा ते साधना करतात, तेव्हा त्यांच्यासोबत पूर्ण शक्ती उभी राहते. त्यांची साधना पाहून सर्वजण पूजा पाठ करण्यात गुंतले आहेत. नरेंद्र मोदी वाट दाखवत आहेत आणि संपूर्ण देश त्यावरून मार्गाक्रमण करत आहे.
दरम्यान, गोरखपूर येथील एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रवी किशन म्हणाले की, यावेळी माता-भगिनी, वृद्ध, तरुण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला साथ दिली आहे, याबाबत टक्काभरही शंका नाही, असा विश्वासही रवी किशन यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचा सातव्या टप्प्यातील प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारी येथे ध्यान साधना करण्यासाठी रवाना झाले होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे नरेंद्र मोदी ज्ञान साधना करत असून, त्यांची साधना आज संध्याकाळी समाप्त होणार आहे.