कडक उन्हामुळे 'या' राज्यातील सरकार चिंतेत, तिसऱ्यांदा वाढवली शाळांची सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 04:04 PM2023-06-18T16:04:12+5:302023-06-18T16:11:27+5:30
शालेय शिक्षण विभागाचे सचिव के. रवि कुमार यांनी म्हटले की, राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत.
मुंबई - झारखंडसरकारने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळांची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली आहे. त्यामुळे, झारखंडमधील सर्वच सरकारी आणि खासगी शाळांना आता २१ जूनपर्यंत सुट्टी असणार आहे. उन्हाळ्यातील तीव्रता अद्यापही कमी होत नसल्याने झारखंड सरकारने तिसऱ्यांदा सुट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून यासंदर्भात १८ जून रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाचे सचिव के. रवि कुमार यांनी म्हटले की, राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत. तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे शाळा आणि कॉलेजेस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. राज्यातील सर्वच सरकारी, खासगी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांना लागू करण्यात येत आहेत. या काळात विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीसंदर्भात वेगळा आदेश जारी करण्यात येईल. राज्यात अद्याप असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याचे रवि कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी ११ जून रोजी शिक्षण विभागाने आदेश जारी करत १२ ते १४ जूनपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, १४ जून रोजी पुन्हा आदेश जारी करुन १७ जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्याचा आदेश जारी केला. आता, तिसऱ्यांदा नव्याने आदेश जारी करण्यात आला असून २१ जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, वाढत्या उन्हाचा कहर पाहाता शाळांना सुरू करण्यास अद्याप झारखंड राज्याने काही वेळ घेतला आहे. दरम्यान, केरळनंतर, गुजरात आणि महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झाले असून आता लवकरच पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.