कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लाट येणार नाही, दोन-तीन आठवड्यात सारं सुरळीत होणार!; तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:45 PM2023-12-22T22:45:26+5:302023-12-22T22:45:56+5:30
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे घाबरून जाण्याची गरज नाही असेही सांगण्यात आले आहे
Coronavirus in India : देशात आणि जगात लोक ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त आहेत याच दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.१ बद्दल सध्या नागरिकांमध्ये घबराट आहे. २१ डिसेंबरपर्यंत देशभरात नवीन व्हेरिएंटची एकूण २२ प्रकरणे समोर आली असून, सर्व रुग्णांमध्ये याची सौम्य लक्षणे आढळून आली बाब दिलासादायक आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता अनेक लोक याला नवी लाट मानत आहेत. पण, तज्ज्ञांचे मत पूर्णपणे भिन्न आहे. याला चौथी लाट म्हणायची गरज नाही. दोन-तीन आठवड्यांत हे सर्व काही सामान्य स्तरावर येईल असे म्हणले असून JN.1 मुळे कोणतीही लाट येण्याची शक्यता नाही असे अनेक जाणकारांचे मत आहे.
घाबरण्याची गरज नाही!
कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरिएंटने नक्कीच चिंता वाढवली आहे. पण, घाबरण्याची गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याचे 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केले आहे. हा शेवटचा प्रकार नाही. भारतात JN.1 ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.
मुंबई बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ.गौतम भन्साळी म्हणाले की, या आजारामध्ये सर्दी, खोकला, ताप यांचा समावेश आहे. पण, परिणाम खूपच कमी असेल. मला वाटत नाही की याने कोणतीही लाट येईल. मुंबईत दहा प्रकरणे आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर थोडीफार वाढ होऊ शकते. लस आणि बूस्टर डोसनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ओमिक्रॉन वेव्हने संपूर्ण जगाला त्रास दिला होता. पण सध्या परिस्थिती अशी आहे की मोठ्या संख्येने लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे लाट येणार नाही.
डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, इन्फ्लूएंझा ए (एच१एन१ आणि एच३एन२), एडेनोव्हायरस, राइनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस यांसारख्या सीझनल फ्लूमुळे होणारे श्वसनाचे आजार मोसमी आजारांना कारणीभूत ठरू शकतात. हे कोविड-19 च्या लक्षणांसारखेच आहेत. ज्या लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास वाढतो त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.