पतीने धक्के मारून घरातून बाहेर काढलं, 'तिने' हाती घेतलं 'धनुष्यबाण'; आता अनेक राज्यांत दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 03:13 PM2023-02-16T15:13:09+5:302023-02-16T15:14:18+5:30
निरक्षर गीताला तिच्या पतीने 30 वर्षांपूर्वी सोडून दिले होते. तेव्हा गीताला एक वर्षाची मुलगी होती.
राजस्थानच्या बोडीगामा गावातील 55 वर्षीय गीता आज इतर महिलांसाठी एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत. वडिलोपार्जित कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निरक्षर गीताला तिच्या पतीने 30 वर्षांपूर्वी सोडून दिले होते. तेव्हा गीताला एक वर्षाची मुलगी होती. पण गीताने हिंमत हारली नाही आणि वडिलांकडून शिकलेले धनुष्यबाण बनवण्याचे कौशल्य जगण्याचे साधन बनवले. आता गीता राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील जत्रांमध्ये धनुष्यबाण विकून भरपूर कमाई करते.
डुंगरपूरच्या साबला ब्लॉकमधील बोडीगामा येथे राहणाऱ्या गीता सरकडा हिच्या पतीने एक वर्षाची मुलगी भावना हिच्यासह तिला घराबाहेर काढलं. त्यावेळी गीता घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्याचे काम करत. पण त्यानंतर जगण्यासाठी उदरनिर्वाह करणं खूप कठीण होत होतं. यावर गीताचे वडील लालजी यांनी तिला धनुष्यबाण बनवून विकण्याचा मोलाचा सल्ला दिला.
लहानपणी गीता तिचे वडील लालाजींना धनुष्यबाण बनवताना पाहत असे. त्यामुळे धनुष्यबाण कसे बनतात याची कल्पना गीताला आली. गीताने आजूबाजूच्या परिसरात धनुष्यबाण बनवून विकायला सुरुवात केली. यामुळे गीताला चांगली कमाई होऊ लागली. नंतर गीताने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील जत्रांमध्ये दुकान थाटून धनुष्यबाण विकायला सुरुवात केली. आज गीता वार्षिक दोन लाख ते तीन लाख रुपये किमतीचे धनुष्यबाण विकते.
गीता 200 ते 2500 रुपयांपर्यंत धनुष्यबाण विकते. गीता लहान मुलांपासून खेळाडूंपर्यंत सर्वांसाठी धनुष्यबाण बनवते. आदिवासी भागात धनुर्विद्या हा प्रमुख खेळ असल्याचे गीता सांगते. इथल्या प्रत्येक घरात धनुष्यबाण सापडतील. म्हणूनच त्यांच्या धनुष्यबाणांना बाजारात जास्त मागणी आहे आणि त्यांचे धनुष्यबाण सहज विकले जातात. धनुष्यबाण विकून गीताने आपली मुलगी भावना हिचे लग्न लावून दिले आणि शिक्षण घेतले आणि घरही बांधले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"