Kolkata Burj Khalifa Pandal: चॉकलेटच्या देवीचं आज दुधात विसर्जन होणार, मिल्कशेक करुन चिमुकल्यांना वाटणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 04:44 PM2021-10-15T16:44:46+5:302021-10-15T16:46:20+5:30
Kolkata Burj Khalifa Pandal: कोलकातामधील एका सुप्रसिद्ध बेकरी कंपनीनं २५ किलो चॉकलेटपासून साकारलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीचं आज विसर्जन केलं जाणार आहे.
Kolkata Burj Khalifa Pandal: कोलकातामधील एका सुप्रसिद्ध बेकरी कंपनीनं २५ किलो चॉकलेटपासून साकारलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीचं आज विसर्जन केलं जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे विसर्जन दुधात केलं जाणार असून त्याचं मिल्कशेक तयार केलं जाणार आहे. त्यानंतर या मिल्कशेकचं वाटप लहान मुलांमध्ये करण्यात येणार आहे. बेकरीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्जियम चॉकलेटपासून तयार करण्यात आलेल्या चार फुटी दुर्गामातेच्या मूर्तीनं नवरात्रीत हजारो भक्तांनी लक्ष वेधून घेतलं होतं. मूर्ती साकारण्यासाठी खूप अभ्यास आणि माहिती गोळा करण्यात आली होती. त्यानंतर शेफ विकास कुमार आणि त्यांच्या टीमनं जवळपास एक आठवड्याहून अधिक वेळ यासाठीची तयारी केली.
दूर्गामातेची संपूर्ण मूर्ती बेल्जियम चॉकलेटपासून साकारण्यात आली असून मूर्तीला मजबूती येण्यासाठी आणि लहान जागा भरण्यासाठी कोको बटरचा वापर करण्यात आला आहे. विजयादशमी साजरी झाल्यानंतर मूर्तीचं दुधात विसर्जन केलं जाईल आणि त्यातून तयार केलं जाणारं मिल्कशेक गरजू लहान मुलांना वाटप केलं जाईल, असं संबंधित बेकरीच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
'बुर्ज खलीफा'चा साकारला होता देखावा
नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोलकातामधील श्रीभूमी स्पोर्ट्स क्लबनं यंदा १४५ फूट उंच 'बुर्ज खलीफा' इमारतीची प्रतिकृती साकारली होती. या देखाव्यानं कोलकातासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सोशल मीडियावर या देखाव्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे देखाव्याच्या रुपात साकारण्यात आलेल्या बुर्ज खलीफावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती. यात राष्ट्रध्वजाच्या रंगांचा वापर करण्यात आला होता. 'बुर्ज खलीफा'चा देखावा हुबेहुब साकारण्यासाठी अॅक्रेलीक शीट्सचा वापर करण्यात आला होता.
तब्बल ६ हजार अॅक्रेलिक शिट्सचा वापर
बुर्ज खलीफाची प्रतिकृती साकारलेला हा देखावा संपूर्ण कोलकातामधील सर्वात उंच देखावा ठरला. यासाठी एका भव्य मैदानाचा वापर करण्यात आला होता. देखाव्याची उंची तब्बल १४५ फूट इतकी आहे. यासाठी ६ हजार अॅक्रेलिक शीट्सचा वापर करण्यात आला. तर जवळपास २५० हून अधिक कामगार गेल्या तीन महिन्यांपासून दिवसरात्र मेहनत घेत होते.