छठपूजेदरम्यान ७ मुलांना जलसमाधी
By admin | Published: November 8, 2016 03:11 AM2016-11-08T03:11:19+5:302016-11-08T03:21:48+5:30
छठपूजेदरम्यान राज्यातील तीन जिल्ह्यांत सोमवारी सकाळी ७ मुलांना जलसमाधी मिळाली. पाटणा जिल्ह्यातील मलाही घाट भागात ८ आणि ९ वर्षांच्या दोन मुली बुडाल्या
पाटणा/मुझफ्फरपूर (बिहार) : छठपूजेदरम्यान राज्यातील तीन जिल्ह्यांत सोमवारी सकाळी ७ मुलांना जलसमाधी मिळाली. पाटणा जिल्ह्यातील मलाही घाट भागात ८ आणि ९ वर्षांच्या दोन मुली बुडाल्या. याच ठिकाणी आणखी दोन मुले बुडण्याच्या मार्गावर होती. सुदैवाने त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुसरी घटना खागरिया जिल्ह्यात घडली. बागमती नदीच्या भरपुरा घाटावर १४ ते १६ वर्षे वयोगटातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही मुले छठपूजेतील अर्घ्य विधीदरम्यान सकाळी खोल पाण्यात स्नान करीत होती. यातील एक मुलगा बुडू लागल्यानंतर इतर दोघांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र तिघेही बुडाले. या तिघांपैकी एकाच्या चुलत्याने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. सुदैवाने ते पोहून सुरक्षितपणे काठावर पोहोचले. तिसरी दुर्घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यात घडली. छट पूजेच्या पवित्र स्नानादरम्यान तीन मुलांचा कदानी नदीत बुडून मृत्यू झाला. इतर दोघांना स्थानिकांनी वाचविले. (वृत्तसंस्था)