निवडणूक काळातच विरोधी नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा? तपास यंत्रणा सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:43 AM2019-03-27T01:43:12+5:302019-03-27T01:43:34+5:30
लोकसभा निवडणुका जवळ येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा प्रकार चालला असल्याचा आरोप होत आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जवळ येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लावण्यास केंद्रीय तपास यंत्रणांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सांगण्यावरून हा प्रकार चालला असल्याचा आरोप होत आहे.
मुलायम सिंह, अखिलेश, कार्ती चिदम्बरम व तृणमूलचे काही नेते निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचारासाठी वेळ मिळू नये व ते चौकशीत ते अडकून पडावेत, या दृष्टीने केंद्रीय तपास यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप एका काँग्रेस नेत्याने खासगीत केला. केवळ विरोधी नेत्यांना त्रास द्यायचा आणि ज्या सत्ताधारी नेत्यांवरील आरोपांकडे दुर्लक्ष करायचे, असा प्रयत्न आहे,
असा आरोप करताना या
नेत्याने भाजपा नेते येडियुरप्पा यांच्यावरील आरोपांचा उल्लेख केला. तो म्हणाला की, येडियुरप्पा यांनी भाजपाच्या नेत्यांना १,८00 कोटी रुपये दिल्याचा आरोप असतानाही त्यांची चौकशी होताना दिसत नाही.
अण्णा द्रमुकच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून, पोल्लाची सेक्स स्कँडलमध्ये त्यांच्या नेत्याचे नाव आहे, पण त्याकडे कानाडोळा करून द्रमुकच्या नेत्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावण्यात आले असल्याची तक्रारही या नेत्याने केली.
यांना होतोय जाच
समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव व अखिलेश यादव, बसपाच्या मायावती व त्यांचा माजी सचिव, तृणमूल काँग्रेसचे काही नेते, काँग्रेसचे कर्नाटकातील नेते डी. के. शिवकुमार, द्रमुकचे मारन बंधू, काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम व त्यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांना निवडणुकीच्या काळात चौकशीत अडकावून ठेवण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार आहे.