निवडणुकीच्या काळात होणारा दहशतवादी कट उधळला, दोन जणांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 10:32 PM2017-10-25T22:32:14+5:302017-10-25T22:37:02+5:30
गुजरात एटीएसने निवडणुकीच्या काळात होणारा एक मोठा कट उधळला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या
सुरत : गुजरात एटीएसने निवडणुकीच्या काळात होणारा एक मोठा कट उधळला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अहमदाबादमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत असलेल्या इसिसच्या दोन संशयितांना गुजरात एटीएसने सुरतमधून ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेली दोघेजण गुजरात निवडणुकीच्या काळात अहमदाबादमध्ये घातपात घडवण्याची तयारी करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.
निवडणुकीच्या वेळी घातपात घडवण्याचा कट हे दोघे आखत होते, अशी माहिती मिळाल्याचे एटीएसने सांगितले. इसिस या दहशतवादी संघटनेला गुजरात निवडणुकांच्या वेळी हल्ला करायचा होता किंवा घातपात घडवायचा होता, अशीही माहिती एटीएसने दिली. या संदर्भात या दोन संशयितांची चौकशी करण्यात येते आहे असेही एटीएसने स्पष्ट केले आहे.
आज दुपारी बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुजरातमध्ये 182 जागांसाठी दोन टप्यांमध्ये 9 आणि 13 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी तर, दुस-या टप्प्यात 14 जिल्ह्यातील 93 जागांसाठी मतदान होईल. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.