मोदी सरकारच्या काळात, भारत आधीएवढाच भ्रष्टाचारी - ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
By admin | Published: January 27, 2016 01:29 PM2016-01-27T13:29:12+5:302016-01-27T13:29:12+5:30
भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुकत भाजपा सत्तेत आल्यानंतरही भारतातल्या भ्रष्टाचाराची स्थिती जैसे थेच असल्याचे व या बाबतीत काहीही सुधारणा झाली नसल्याचे एका आंतरराष्ट्राय पाहणीत आढळून आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुकत भाजपा सत्तेत आल्यानंतरही भारतातल्या भ्रष्टाचाराची स्थिती जैसे थेच असल्याचे व या बाबतीत काहीही सुधारणा झाली नसल्याचे एका आंतरराष्ट्राय पाहणीत आढळून आले आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स २०१५, यामध्ये भारताचे गुण आधीएवढेच म्हणजे ३८ असल्याचे आढळले आहे. ० ते १०० यामध्ये जितके जास्त गुण तितका कमी भ्रष्टाचार असे गणित आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने CPI किंवा करप्शन परसेप्शन इंडेक्स बुधवारी जाहीर केला आहे. यानुसार भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताचा क्रमांक ८५ वरून घसरून ७६ झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या भारत कमी भ्रष्टाचारी झाला आहे. परंतु, २०१४ मध्ये केलेल्या पाहणीत १७४ देश होते, तर २०१५ च्या पाहणीत देशांची संख्या १६८ होती. त्यामुळे भारताची वास्तवातली स्थिती आधीएवढाच भ्रष्टाचारी अशी असल्याचे या पाहणीचे सांगणे आहे.
भूतान या देशाचा अपवाद (२७ क्रमांकावर असलेला भूतान या बाबतीत आपल्यापेक्षा खूप चांगला आहे) वगळता भारताचे सगळे शेजारी चांगलेच भ्रष्टाचारी असल्याचेही या पाहणीत आढळले आहे. चीन ८३ व्या स्थानावर आहे, तर बांग्लादेश १३९व्या स्थानावर आहे. पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळही असेच शेजारी राष्ट्रांप्रमाणे भ्रष्टाचारी आहेत.
या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारत व श्रीलंकेतील नेत्यांनी केलेले भ्रष्टाचार निर्मूलनाचे दावे वास्तवात उतरलेले नाहीत. चर बांग्लादेश व कंबोडियासारखे देश समाजावर घणाघाती हल्ले करत भ्रष्टाचार निपटण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तान व पाकिस्तानमधल्या समस्यांच्या मूळाशीही भ्रष्टाचार आहे तर जबर शिक्षा ठोठावूनही चीनमधला भ्रष्टाचार निपटला जात नाही अशी स्थिती आहे.
ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे आशिया पॅसिफिकचे संचालक श्रीराक प्लीपत यांच्या सांगण्यानुसार, भारतात भ्रष्टाचार विरोधी कारवाई करू अशा आश्वासनांचा पूर निवडणुकांच्या काळापासून आला होता, परंतु पाहणी असं सांगते की, काहीही सुधारणा नाही. मोठमोठ्या वल्गना अद्याप जमिनीवर उतरायच्या आहेत, हे वास्तव आहे.
मोदी सरकारने अत्यंत जलदगतीने व मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु वास्तवात अगदी संथ प्रमाणात व लहान आकारात हे वचन अवतरल्याचं प्लीपत यांनी म्हटलं आहे.
जगभरात सगळ्यात कमी भ्रष्टाचारी असलेल्या डेन्मार्कने सलग दुस-या वर्षी पहिले स्थान राखले आहे. त्याखालोखाल फिनलंड व स्वीडन या देशांचा क्रमांक लागतो. कमी भ्रष्टाचारी देशांमध्ये प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य, बजेटच्या पैशान पैशाचा लोकांना मिळणारा हिशोब, सत्तेत असलेल्या लोकांचा प्रामाणिकपणा आणि निरपेक्ष तसेच सचोटीची व स्वायत्त न्यायव्यवस्था ही भ्रष्टाचार मकी असण्यामागची कारणे असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने नमूद केले आहे.