मोदींच्या काळात 200 टन सोनं देशाबाहेर गेलं, आरबीआयनं सांगितलं खरं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:29 PM2019-05-03T21:29:33+5:302019-05-03T21:31:48+5:30
जगभरातील केंद्रीय बँकाकडून आपले सोने सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडसह इतरही काही देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये हे सोने ठेवण्यात येते.
नवी दिल्ली - मोदींच्या कार्यकाळात 200 टन सोने देशाबाहेर गेल्यासंदर्भात काही न्यूज पोर्टल्सने बातम्या दिल्या होत्या. मात्र, सन 2014 किंवा त्यानंतर एक तुकडाही सोनं देशाबाहेर गेलं नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियात आलेल्या बातम्यांनंतर आरबीआयने याबाबतचा खुलासा केला आहे.
जगभरातील केंद्रीय बँकाकडून आपले सोने सुरक्षित ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडसह इतरही काही देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये हे सोने ठेवण्यात येते. विशेष म्हणजे ही साधारण बाब आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2014 किंवा त्यानंतर देशातील एक ग्रॅमही सोने देशाबाहेर ठेवले नसल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. माध्यमात जे अहवाल सादर होत आहेत, ते तथ्यहिन असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये, 2014 नंतर आरबीआयने 200 टन सोने स्वित्झर्लंडमध्ये पाठवल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने एका अहवालाचा दाखला देत, मोदी सरकारच्या कार्यकाळात 200 टन सोनं देशाबाहेर गेल्याचं या ट्विटमधून सांगितलं.
ओव्हरसीज चायना बँकींग कॉर्पचे अर्थतज्ञ होवेई ली यांच्या मते, आरबीआय 2019 मध्ये 15 लाख औंस सोने खरेदी करू शकते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) च्या मते, 2018 मध्ये आरबीआयने एकूण 42 टन सोने खरेदी केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीतील सोने खरेदीनंतर देशातील स्वर्ण भांडार वर्तमानात एका विशिष्ठ उच्च स्तरावर पोहोचला आहे. सध्या आरबीआयकडे जवळपास 609 टन सोने आहे. रशियाने 2018 मध्ये सर्वाधिक 274 टन सोन्याची खरेदी केली आहे.
RBI clarifies on safe custody of its gold reserveshttps://t.co/md7yxKOdJD
— ReserveBankOfIndia (@RBI) May 3, 2019