पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्रानं मागितले होते 7.5 कोटी, भगवंत मान यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 09:48 PM2022-04-01T21:48:21+5:302022-04-01T21:49:46+5:30
1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते.
पठाणकोट हल्ल्यावेळी लष्कर पाठवण्याच्या बदल्यात केंद्र सरकारने पंजाब सरकारकडे 7.5 कोटी रुपयांची मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोदी सरकारवर केला आहे. पंजाब विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख करत ही माहिती दिली.
मुंख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, मी आणि आम आदमी पक्षाचे नेते साधू सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, की आपण हे पैसे आम्हाला मिळणाऱ्या संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या (MPLAD) निधीतून कापून घ्या आणि या बदल्यात आम्हाला फक्त, पंजाब भारताचा भाग नाही, आम्ही लष्कर भाड्याने घेत आहोत, असे लिहून द्या.
पठाणकोट एअरबेसवर हल्ल्या झाल्यानंतर, लष्कर नंतर पोहोचले, त्याआधी सरकारचे पत्र आले, की लष्कर पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे, यामुळे पंजाबला 7.5 कोटी रुपये द्यावे लागतील, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्त संस्थेने यासंदर्भातील मुख्यमंत्री मान यांच्या भाषणाचा तो भागही प्रसिद्ध केला आहे.
During Pathankot attack,military came.Later I received letter that Punjab should pay Rs 7.5 Cr as military was sent.Sadhu Singh&I went to Rajnath Singh.Told him to deduct from my MPLAD but give in writing that Punjab isn't country's part&took military from India on rent:Punjab CM pic.twitter.com/Gbg7yIJTRj
— ANI (@ANI) April 1, 2022
1 जानेवारीला 2016 रोजी सकाळच्या सुमारास पाकिस्तानच्या चार दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या सात जवानांना हौतात्म्य आले होते. सुमारे 80 तास चाललेल्या चकमकीत लष्कराने चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर पठाणकोट हल्ल्याचा बदला घेत भारताने 29 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त केली होती.