''रालोआच्या राजवटीत देशात भीतीचे वातावरण''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 05:07 AM2019-09-17T05:07:18+5:302019-09-17T05:07:56+5:30
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला.
कोटा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात आर्थिक मंदीमुळे लोक नोकऱ्या गमावत असून, दुसºया बाजूला रोजगाराच्या संधी निर्माण होणे बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील माहोल बिघडला आहे. अशा प्रकारची धोकादायक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे.
कोटा येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अशोक गेहलोत तिथे आले होते. ते म्हणाले की, देशाला आर्थिक मंदीच्या झळा बसत आहेत. नजीकच्या काळात ही स्थिती आणखी बिघडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील स्थिती बिघडली असून, त्या परिस्थितीला नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रालोआ सरकार जबाबदार आहे. समाजातील एकही घटक आज समाधानी नाही, तरीही ते मोदी-मोदीचा गजर करीत आहेत कारण जनता दहशतीखाली आहे. (वृत्तसंस्था)
>काश्मीरमध्ये मानवी हक्कांची गळचेपी
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून स्थानिक लोकांना जणू घरात कोंडून ठेवले आहे.
मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी संचारबंदीपासून अन्य निर्बंधही लादण्यात आले. या कारवाईमुळे मानवी हक्कांची गळचेपी झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले पाहिजे, असेही गेहलोत म्हणाले.