"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 03:40 PM2024-10-14T15:40:38+5:302024-10-14T15:48:45+5:30

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एका महिलेने रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी पती, सासू-सासरे आणि नणंदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. 

dussehra instead of raavan woman set fire to the effigies of her husband mother in law | "समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एका महिलेने रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी पती, सासू-सासरे आणि नणंदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. 

शनिवारी संपूर्ण देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा झाला. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मुस्करा परिसरात एका महिलेने आपला नवरा, सासू, सासरा आणि नणंदेचा फोटो चिकटवले आणि त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

मुस्करा परिसरात राहणाऱ्या प्रियंकाचं लग्न चौदा वर्षांपूर्वी संजीव दीक्षितसोबत झालं होतं. तिच्या नवऱ्याचं आधीपासूनच त्याच्या बहिणीची मैत्रीण पुष्पांजली हिच्यासोबत अफेअर होतं. त्यामुळेच संजीवने काही दिवसांनी प्रियंकाला सोडलं आणि पुष्पांजलीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला.

प्रियंकाला हा धक्कादायक प्रकार समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने याला विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र सासू-सासरे आणि नणंदेने तिची बाजू समजून घेतली नाही. तिला त्यांची मदत झाली नाही. गेल्या १४ वर्षांपासून तिच्या आयुष्यात दु:ख आहे. न्यायासाठी ती वणवण भटकत आहे. 

दसऱ्याच्या दिवशी त्यामुळेच तिने नवऱ्याच्या घरासमोरच सासरच्या लोकांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले. समाजातील रावणासारखं वागणाऱ्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे असा संदेश तिने या व्हिडीओतून देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाला १४ वर्षे उलटून गेली आहेत, तरीही वनवास संपलेला नाही असं प्रियंका दीक्षितने सांगितलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे प्रियंकाने न्याय मिळावा म्हणून मदत मागितली आहे. प्रियंका म्हणाली की, योगी सरकार 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' मोहीम चालवत आहे आणि आज एका सुशिक्षित मुलीला वाचवलं जात नाही. तसेच सरकारकडे न्याय मागत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.
 

Web Title: dussehra instead of raavan woman set fire to the effigies of her husband mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.