धुळीच्या वादळामुळे राजधानी दिल्लीला मोठा तडाखा; दोन जणांचा मृत्यू, २३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 10:10 IST2024-05-12T10:06:57+5:302024-05-12T10:10:27+5:30
वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात एनसीआर क्षेत्रात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आणि काही ठिकाणी भिंतींचे भागही कोसळले.

धुळीच्या वादळामुळे राजधानी दिल्लीला मोठा तडाखा; दोन जणांचा मृत्यू, २३ जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शुक्रवारी (दि. १० मे) रात्री उशिरा देशाची राजधानी शहर असलेल्या नवी दिल्लीसह संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला (एनसीआर) धुळीच्या जोरदार वादळाने तडाखा दिला. या वादळाच्या संबंधित दुर्घटनामध्ये किमान दोनजण ठार आणि २३ जखमी झाल्याची माहिती आहे.
वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात एनसीआर क्षेत्रात झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले आणि काही ठिकाणी भिंतींचे भागही कोसळले. विजेचे खांब उन्मळून पडल्याने शुक्रवारी रात्री उशिरा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला. पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे झाडाची फांदी अंगावर पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. क्रेनच्या साहाय्याने फांदी काढून दुचाकीस्वार जयप्रकाश याला जवळच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दुसऱ्या घटनेत के. एन. काटजू मार्गावरील आयबी ब्लॉकजवळ रात्रीच्या सुमारास एक मजूर झाडाखाली अडकला. जखमी अवस्थेत त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; पण डॉक्टरांनी सांगितले की, तो आधीच मरण पावला होता.