तान्हुलीसह कर्तव्य बजावले; झाली पसंतीच्या गावी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:16 AM2018-10-30T04:16:30+5:302018-10-30T04:17:01+5:30
महिला कॉन्स्टेबलच्या कामाचे महानिरीक्षकांकडून कौतुक
झांसी (उत्तर प्रदेश) : आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अर्चना जयंत यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरताच त्यांचे फक्त कौतुकच झाले, असे नाही तर पोलीस खात्याने त्यांची बदली त्यांच्या पसंतीच्या जिल्ह्यात केली.
झांसी जिल्ह्यात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात अर्चना जयंत यांची नियुक्ती होती. तेथे त्या तान्ही मुलगी अनिका हिच्यासह कर्तव्यावर होत्या. तेथे कोणीतरी त्यांचा फोटो काढला व तीन दिवसांपूर्वी तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. या फोटोला मोठ्या संख्येने फक्त लाइक्सच मिळाले, असे नाही तर कर्तव्य बजावणाºया अर्चना यांच्या समर्पणाबद्दल उप पोलीस महानिरीक्षक (झांसी झोन) सुभाष सिंह यांनी त्यांचे कौतूक करू एक हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केले.
राज्याचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह हे अर्चना जयंत यांच्याशी रविवारी बोलले व त्यांनी जयंत यांच्या पसंतीच्या आग्रा जिल्ह्यात बदलीचे आदेशही दिले. झांसीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनोद कुमार सिंह यांनी जिल्ह्यात सुमारे ३५० महिला कॉन्स्टेबल्स नियुक्त असल्याचे व त्यातील १०० जणी या त्यांना लहान मुले असतानाही कर्तव्य बजावत असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
आता कुटुंबाला मिळेल आधार
पोलीस सूत्रांनी सांगितले की, अर्चना यांचे कुटुंब आग्य्रात तर सासरकडील मंडळी कानपूरमध्ये राहत आहेत. त्यांचा पती गुरगावला खासगी कंपनीत आहे. अर्चना जयंत यांची नियुक्ती कानपूरला होऊ शकत नसल्यामुळे आग्य्राला त्यांनी पसंती दिली. त्यानुसार त्यांच्या बदलीचे आदेश दिले गेले आहेत. आता त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळेल. अर्चना जयंत यांना दहा वर्षांची मुलगीही आहे.