IAS अधिकाऱ्याची कर्तव्यनिष्ठा, प्रसुतीनंतर 14 दिवसात ऑन ड्युटी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 10:55 AM2020-10-13T10:55:00+5:302020-10-13T10:55:59+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या आईंच्या निधनानंतर केवळ 3 दिवसांत विधी उरकून कामावर हजर झाले होते. कोरोना कालावधीत अशी अनेक उदाहरणे आहेत, जी प्रेरणदायी व आपत्कालीन परिस्थितीत आदर्श बनली आहेत.
नवी दिल्ली - कोविड 19 च्या महामारीत देशातील प्रशासन यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली असून कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्याही सुट्ट्या कमी व काम जास्त अशी अवस्था झाल्याचं दिसून येतंय. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार यांसह प्रशासन यंत्रणांवर कामाचा मोठा ताण पडला आहे. या काळात अनेक वेगवेगळे अनुभव आपल्याला पाहायला मिळाले आहेत. गाझियाबादच्या एका महिला नोडल ऑफिसरने प्रसुतीनंतर केवळ 14 दिवसांत ड्युटी जॉईन करुन आदर्श निर्माण केला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आपल्या आईंच्या निधनानंतर केवळ 3 दिवसांत विधी उरकून कामावर हजर झाले होते. कोरोना कालावधीत अशी अनेक उदाहरणे आहेत, जी प्रेरणदायी व आपत्कालीन परिस्थितीत आदर्श बनली आहेत. आता, उत्तर प्रदेशमधील एका महिला अधिकाऱ्यानेही कामाप्रती आपली तत्परता कृतीतून दाखवून दिलीय. गाझियाबाद जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सौम्या पांडे या 7 महिन्यांच्या गर्भवती असताना जुलै महिन्यात गाझियाबाद येथे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त झाल्या होत्या. त्यावेळी, जिल्ह्यात दररोज 100 कोविडचे रुग्ण आढळून येत होते. या काळात त्या प्रसुतीरजा घेऊन सुट्टीवर जाऊ शकत होत्या, मात्र कोरोना काळात आपले कर्तव्य बजावण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. सध्या कार्यालयातच त्या आपल्या बाळासह हजर राहतात, अनेक बैठकाला हजेरी लावून यंत्रणांसोबत सातत्याने फोनवरुन संभाषणही करतात.
सौम्या यांनी 17 सप्टेंबर रोजी मेरट रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी म्हणजे केवळ 14 दिवसांतच त्यांनी आपली ड्युटी जॉईन केली. कोरोना विरुद्धच्या लढाईत अनेकजण न थकता आपलं कर्तव्य बजावत आहेत. ते पाहून मीही माझं कर्तव्य सोडू शकले नाही. त्यामुळेच, मी केवळ 22 दिवसांची प्रसुती रजा घेऊन, 14 दिवसांत पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतले आहे, असे सौम्या यांनी म्हटले. दरम्यान, सौम्या यांनी 2016 साली देशात 4 थ्या क्रमांकाने युपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर, 2019 साली गाझियाबादच्या जिल्हा-दंडाधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.