कॅन्सरग्रस्त आयपीएसचे ड्युटी फर्स्ट, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:21 AM2020-04-29T04:21:59+5:302020-04-29T04:22:44+5:30
कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजूरांना धीरही दिला.
नवी दिल्ली : दिल्लीचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त म्हणून नुकतीच नियुक्ती झालेले युवा आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी स्वत:वरील कर्करोगाचे उपचार थोडे दिवस बाजूला ठेवून लॉकडाऊनच्या काळात आपल्या कार्यकक्षेतील विभागामध्ये चोख बंदोबस्त राखण्याच्या कामास प्राधान्य दिले. तसेच कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांना धीरही दिला.
त्यांना थायरॉइड ग्रंंथीमध्ये कर्करोग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी पुढील उपचार घेणे बाजूला ठेवून पोलिस दलातील आपले काम सुरुच ठेवले होते. लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात हजारो स्थलांतरित मजूर अडकून पडले आहेत. त्यांचे जेवणाखाणाचे हाल होत असून निवाऱ्याच्या अपुºया सोयींमुळे या मजूरांनी रस्त्याला कडेला आश्रय घेतला आहे. नेमका हा भाग आनंद मिश्रा यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने या स्थलांतरित मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्याबरोबरच, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले.
मिश्रा यांना थायरॉईड ग्रंथींमध्ये झालेला कर्करोग शरीरात अन्यत्र पसरण्याचा धोका आणखी वाढल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. तसे डॉक्टरांनी सांगताच मग आनंद मिश्रा रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांनी काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
अस्वास्थ्यामुळे विचलित झाले नाहीत
दिल्लीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, कर्करोगामुळे प्रकृतीत बिघाड झाला असतानाही अतिरिक्त पोलीस उपायुक्त आनंद मिश्रा आपल्या सहकाऱ्यांसमवेत कार्यकक्षेतील विभागात रोज फेरफटका मारत. लॉकडाऊनमुळे दिल्ली परिसरात अडकून पडलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांची मिश्रा चौकशी करत असत. प्रत्येकाला अन्नधान्याचे वाटप झाले आहे की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असे. एक एप्रिल रोजी मिश्रा यांच्या घशात दुखू लागल्यामुळे कोरोनासह अन्य काही चाचण्या डॉक्टरांनी केल्या. त्यांच्या थायरॉईडच्या ग्रंथीत कर्करोग झाल्याचे निदान त्यातून झाले. मात्र तरीही विचलित न होता आनंद मिश्रा यांनी आपले काम सुरूच ठेवले होते.