जवान बनले देवदूत! आजारी वृद्धाला खांद्यावरुन २ किमी नेले; वेळेत उपचारामुळे वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:10 PM2022-05-03T15:10:36+5:302022-05-03T15:11:41+5:30
कडक सॅल्यूट करत जवानांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मलकानगिरी: भारतीय जवान केवळ सीमेवरच लढत नाहीत, तर देशातील ग्रामीण भागात मदतीसाठी पुढे असतात. याचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. ओडिशा राज्यातील एका दुर्गम भागात एका आजारी वृद्धाला उपचारांची अतिशय तातडीची गरज होती. मात्र, तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यास कुटुंबाला अडचणी येत होत्या. या भागात कार्यरत असणाऱ्या जवानांनी २ किमीची पायपीट करत आजारी वृद्धाला खांद्यावरून नेले आणि रुग्णालयात दाखल केले. अतिशय वेळेत उपचार मिळाल्याने वृद्धाला जीवनदान मिळाले. या प्रसंगांनंतर त्या जवानांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
ओडिशातील मलकानगिरी येथे जिल्हा स्वयंसेवी दलाच्या (DVF) जवानांनी एका वृद्धाचे प्राण वाचवले आहेत. या जवानांनी आजारी वृद्धाला २ किमीपर्यंत चालत जाऊन रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याचे प्राण वाचले. असे करून डीव्हीएफ जवानांनी एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे स्थानिक लोकांनी खूप कौतुक केले. DVF हे ओडिशा पोलिसांचे विशेष युनिट आहे.
वृद्धाचे कुटुंब चिंतेत होते
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्धाची तब्येत फारच खालावली होती. त्यांची प्रकृती सतत खालावत चालली होती. आजारी वृद्धाचे नातेवाईक खूप चिंतेत होते. दरम्यान, तेथे आलेल्या जवानांनी वृद्धाच्या कुटुंबाला चिंतामुक्त केले. वृद्ध व्यक्तीच्या मदतीसाठी डीव्हीएफचे सैनिक देवदूत म्हणून पुढे आले. त्यांनी आजारी वृद्धाला एका खाटेवर झोपवले आणि नंतर उचलून २ किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे आजारी वृद्धाला वेळेत उपचार मिळू शकले आणि त्यांचे प्राण वाचले.
दरम्यान, DVF जवान मलकानगिरीच्या मैथिली ब्लॉकमधील के.कामरापल्ली गावात जनजागृती शिबिरात होते. याचवेळी जवानांना आजारी वृद्ध अपू पदियामी यांच्याबाबत माहिती मिळाली. डीव्हीएफचे जवान तातडीने वृद्धाच्या घरी पोहोचले. वाहनांचा रस्ता नसल्यामुळे DVF कर्मचार्यांनी एका खाटेची व्यवस्था केली आणि चालत जाऊन २ किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात वृद्धाला दाखल केले.