कोर्टाच्या इतिहासात प्रथमच वडिलांनंतर मुलगाही सरन्यायाधीश! महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:15 AM2022-11-10T09:15:27+5:302022-11-10T09:16:19+5:30
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील ४४ वर्षांपूर्वी सरन्यायाधीश होते.
नवी दिल्ली :
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही. चंद्रचूड हेदेखील ४४ वर्षांपूर्वी सरन्यायाधीश होते. ते सर्वाधिक काळ देशाचे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात माजी सरन्यायाधीशांचा मुलगा या पदावर पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची सूची समृद्ध करणारे न्यायाधीश म्हणून गणले जाणारे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्याकडे तीक्ष्ण, स्पष्ट आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. चंद्रचूड यांना त्यांच्या वर्तुळात ‘डीवायसी’ म्हणून संबोधले जाते.
वडिलांचा निर्णय फिरवला
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी २०१८ मध्ये विवाहबाह्य संबंध रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. १९८५ मध्ये, तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने एका प्रकरणात कलम ४९७ कायम ठेवले होते. त्यात संंबंध बनविण्यासाठी एक पुरुषच जबाबदार असतो स्त्री नाही, असे गृहीत धरण्यात आले होते. डी. वाय. चंद्रचूड यांनी २०१८ च्या निकालात हा निर्णय रद्द केला.
- सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. धनंजय वाय. चंद्रचूड यांना भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथ दिली.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना आदरपूर्वक शुभेच्छा. आणखी एक महाराष्ट्राचा सुपुत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहे, हे निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. धनंजय चंद्रचूड आपल्या कारकिर्दीत भारताच्या न्यायिक क्षेत्रातील गौरवात आपल्या कामगिरीने भर घालतील, असा विश्वास आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सावंतवाडीशी जवळचे नाते...
चंद्रचूड कुटुंबाचे सावंतवाडीशी जवळचे नाते असून, वडील यशवंत चंद्रचूड यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले, तर आजोबा राजघराण्याचे दिवाण म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. चंद्रचूड घराण्याची नाळ पूर्वीपासून सावंतवाडीशी जोडली गेलेली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सावंतवाडी संस्थानात दिवाण होते. तीन पिढ्या ते सावंतवाडी संस्थानशी नाळ ठेवून होते, असे सांगण्यात आले.
‘डीवायसीं’ची कारकीर्द
- ११ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेले आणि हार्वर्डला जाण्यापूर्वी सेंट स्टिफन कॉलेज आणि कॅम्पस लॉ सेंटरमध्ये शिकलेले डी. वाय. चंद्रचूड दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी मानले जातात.
- त्यांची १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती.
- याआधी ते मुंबई न्यायालय तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
- त्यांनी १९९८ मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे.
- तसेच अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापनही केलेले आहे.
राज्यात पहिले येण्याची हॅट् ट्रिकही
चंद्रचूड परिवाराचा पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. त्यांचे मूळ गाव कणेरसर (ता. खेड) येथील वाडा तर अजूनही अस्तित्व ठेवून आहे. कणेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात. गावातील काहीजणांनी सांगितले की, यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन १९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. पिता-पुत्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याबरोबरच राज्यात एलएल.बी. परीक्षेत सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिकही चंद्रचूड परिवाराच्या नावावर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
महत्त्वाचे निर्णय...
- अयोध्या जमीन वाद, कलम ३७७, गोपनीयतेचा अधिकार, शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश, गर्भधारणेबाबच्या कायद्याची व्याप्ती यासह अनेक महत्वाच्या निर्णयांंमध्ये त्यांचा सहभाग होता.